सातारा : कारखान्यांची आऊटस्टँडिंग हजार कोटींवर | पुढारी

सातारा : कारखान्यांची आऊटस्टँडिंग हजार कोटींवर

सातारा : महेंद्र खंदारे सातारा जिल्हा बँकेच्या मुख्य उत्पन्‍नाच्यास्रोतांपैकी एक असणार्‍या साखर कारखान्यांची यंदाची आऊटस्टँडिंग घसरली आहे. थेनॉलचे उत्पादन आणि कच्च्या साखरेची मोठ्या प्रमाणात झालेली निर्यात यामुळे कारखान्यांची आऊटस्टँडिंग घसरली आहे. गत दोन वर्षांपूर्वी याच कालावधीतील 1700 ते 1800 कोटींची आऊटस्टँडिंग 1 हजार कोटींवर आली आहे. त्यामुळे व्याज कमी मिळाल्याने जिल्हा बँकेला उत्पन्‍नावर पाणी सोडावे लागले आहे. तर कारखान्यांची पैशाची बचत होवून त्यांना एफआरपी अधिक देणे सोपे झाले आहे.

सातारा जिल्हा हा साखरेचा आगार म्हणून ओळखला जातो. पश्‍चिम महाराष्ट्रात ल्हापूरनंतर सर्वाधिक साखरेची निर्मिती सातार्‍यात होते. सातारा जिल्ह्यात सध्याच्या घडीला 14 साखर कारखाने कार्यरत आहेत. त्यातील 8 कारखाने हे सातारा जिल्हा बँकेकडून हंगाम सुरू होण्यापूर्वी कर्ज उचलतात. तसेच हंगाम सुरू झाल्यानंतर जस जशी साखरेची निर्यात होत जाईल, तसतसे कर्जाचे हफ्ते फेडत जातात.

साखर कारखान्याचे दैनंदिन गाळप, त्यावरून होणारी हंगामात सरासरी किती साखरेची पोती होतील या अंदाजावरून कारखान्याला कर्जाचा कोटा ठरवला जातो. या कोट्याइतके कर्ज प्रत्येक कारखाना घेत नसला तरी 70 ते 80 टक्के कर्ज कारखाने उचलत असतात. जोपर्यंत कर्ज सुरू असते तोपर्यंत कर्जावरील व्याजामधून मोठे उत्पन्‍न बँकेला मिळते. जिल्हा बँकेकडून दरवर्षी कारखाने सुमारे 2 हजार कोटींचे कर्ज घेतात. दरवर्षी हंगाम संपल्यानंतरही 1700 ते 1800 कोटींची आऊटस्टँडींग (थकबाकी) कारखान्यांची असते. मात्र, यंदा चित्र बदलले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथेनॉल निर्मितीला दिलेले प्रोत्साहन आणि कच्च्या साखरेची मोठी निर्यात झाली. त्यामुळे साखरेमध्ये अडकलेले पैसे लवकर कारखानदारांना मिळाले. त्यामुळे पैसे लवकर आल्याने जिल्हा बँकेला कारखानदारांनी पैसे दिले. त्यामुळे हंगाम सुरू असतानाच मोठ्या प्रमाणात मुद्दलीची परतफेड झाली. त्यामुळे आऊटस्टँडिंगही घसरली. सध्याच्या घडीला कारखान्यांची 1 हजार कोटींची आऊटस्टँडिंग आहे. यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत 700 ते 800 कोटींची घसरण झाली आहे. त्यामुळे या रकमेवरील व्याज बँकेला मिळाले नाही.

साखर निर्यातीत अव्वल असणार्‍या ब्राझील देशात पडलेला दुष्काळ हाही यासाठी कारणीभूत ठरला आहे. पक्क्या साखरेपेक्षा कच्च्या साखरेला यंदा मागणी वाढली होती. त्यामुळे कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात कच्च्या साखरेचे उत्पादन केले. याचे करार होण्यात अडचणी न आल्याने साखर निर्यात झाली. याचबरोबर सातारा जिल्ह्यातील कारखान्यांनी यंदाच्या हंगामात 60 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले. याचेही करार होवून पैसे मिळाल्याने कारखान्यांनी कर्जाचे हफ्ते भरण्यावर भर दिला होता. त्याचाच फटका जिल्हा बँकेला बसला आहे. यंदाही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्रत्येक कारखान्याचे 10 कोटी वाचले

कारखानदारांची आऊटस्टँडिंग घसरल्याने कारखानदारांना मोठा फायदा झाला आहे. यंदा 700 ते 800 कोटी रुपयांचे प्रत्येक कारखान्यांचे 10 कोटी रुपये वाचले आहेत. ही झालेली बचत म्हणजे कारखान्यांचे एकप्रकारे उत्पन्‍नच आहे. त्यामुळे कारखानदारांना अतिरिक्‍त एफआरपी देता येणार आहे. परंतु, बहुतांश कारखान्यांनी दोनच हफ्ते दिले आहेत. त्यानंतर दमडीही कारखानदारांनी शेतकर्‍यांना दिलेली नाही. यासाठी शेतकर्‍यांमध्ये जनजागृती होणे गरजेचे झाले आहे.

कारखान्यांची आऊटस्टँडिंग घसरल्याने बँकेच्या नफ्यात घट झाली आहे. मात्र, नफ्यातील घट भरून काढण्यासाठी अन्य स्रोत शोधण्यात आले आहे. त्यातून नफा वाढणार आहे. यामुळे बँकेला फारसा फरक पडणार नाही.
– डॉ. राजेंद्र सरकाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा बँक

हेही वाचा

Back to top button