सातारा : दरीत पडलेल्या युवकास जीवदान | पुढारी

सातारा : दरीत पडलेल्या युवकास जीवदान

महाबळेश्वर (पुढारी वृत्तसेवा) : पांडवगड येथे विनायक राजपुरे रा. वाई हा युवक आपल्या सहकारी मित्रांसमवेत फिरण्यासाठी गेला होता. गड चढताना पाय घसरुन तो खोल दरीत कोसळला. दैव बलवत्तर म्हणून तो 80 फूट खोल दरीतील झाडांच्या वेलीत अडकला. ही बाब महाबळेश्‍वर ट्रेकर्स, योध्दा ट्रेकर्स, पांडेवाडी ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी त्याला सुखरुप दरीबाहेर काढले.

या घटनेची माहिती मिळताच त्याला वाचवण्यासाठी योद्धा ट्रेकर्स, पांडेवाडी ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. एमएमआरसीसी या ग्रुपवर या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अ‍ॅन्ड रेस्क्यू टीम पांडवगडावर दाखल झाल्या. योद्धा ट्रेकर्स, परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने या युवकाला दरीतून सुखरूप बाहेर काढले. जखमी युवकाला वाई येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बचावकार्यात योद्धा ट्रेकर्स, पांडेवाडी ग्रामस्थ, महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनीलबाबा भाटिया,जयवंत बिरामणे,अमित झाडे, अनिल लांगी,अमित कोळी, रेस्क्यू टीमचे आशिष बिरामणे, तेजस जवळ आदींचा सहभाग होता.

हेही वाचलत का ?

Back to top button