आता एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढता येणार! | पुढारी

आता एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढता येणार!

सायबर दरोडेखोरांकडून केल्या जाणार्‍या कार्ड क्लोनिंगच्या घटना वाढीस लागल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार आता एटीएम सेंटरमध्ये आपल्याला कार्डशिवाय पैसे काढता येणार आहेत. थोडक्यात ही प्रक्रिया आता कार्डलेस होणार आहे.

बँकिंग प्रणालीमध्ये आणि एकंदरच आर्थिक व्यवहारांमध्ये सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. दोन-चार वर्षांपूर्वीपर्यंत मोबाईलवरून पाच रुपयांपासून लाखो रुपये काही क्षणात दुसर्‍या व्यक्तीला ट्रान्स्फर करता येतील, ही संकल्पना स्वप्नच वाटायची. पण यूपीआयच्या माध्यमातून ती केवळ प्रत्यक्षातच आली नाही, तर अगदी गावा-खेड्यापर्यंत पोहोचली. बँकांमध्ये जाऊन पैसे काढणे, धनादेशांचा वापर करणे किंवा रांगेत थांबून एटीएममधून पैसे काढणे या गोष्टी कराव्या लागायच्या.

पण आता त्यासाठीची किमान पर्यादा ओलांडल्यानंतर शुल्क भरणे अशा अनेक गोष्टींमधून लोकांची यूपीआयमुळे सुटका झाली. इतकेच नव्हे, तर मोबाईल बिल, टेलिफोन बिल, गॅस बुकिंगपासून ऑनलाईन वस्तू मागवणे यांसारख्या गोष्टीही पेमेंट अ‍ॅपमुळे अतिसुलभ बनल्या. यूपीआयचा वापर इतर गोष्टींत बराच वाढला असला तरी आजही रोखीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. तथापि, आजच्या घडीला रोख रक्कम काढण्यासाठी बँकांमध्ये जाणार्‍यांची संख्या रोडावली आहे. कारण हल्ली बहुतांश बँकांनी एटीएमची सुविधा बचत, चालू खातेदारांना सहज देऊ केली आहे. त्यामुळे बहुतांश जण एटीएम सेंटरमधून रोख रक्कम काढण्याचा सोपा पर्याय स्वीकारतात.

खरे पाहता एटीएमची व्यवस्था ही सुरक्षित आहे. परंतु अलीकडील काळात सायबर गुन्हेगारांनी अनेक क्लृप्त्या लढवण्यास सुरुवात केल्यामुळे या सुरक्षेलाही आता भगदाड पाडले जाऊ शकते, हे सिद्ध झाले आहे. एटीएम सेंटरमध्ये स्किमर लावून कार्ड क्लोनिंग करण्याच्या घटना वाढल्या आहेत.

एटीएम क्लोनिंग म्हणजे काय?

बँकेच्या एटीएम मशिनमध्ये आपण पिन क्रमांक टाकतो किंवा आपले कार्ड स्वाईप करतो तिथे काही वेळा गुन्हेगारांकडून एक स्क्रिनिंग यंत्र बसवलेले असू शकते. हे यंत्र चटकन लक्षात येत नाही. एटीएम मशीनचाच तो एक भाग असल्यासारखे भासते; परंतु प्रत्यक्षात या यंत्राद्वारे आपल्या डेबिट कार्डची माहिती आणि पिन क्रमांक टिपला जातो आणि त्याआधारे आपल्या एटीएम कार्डचे डुप्लिकेट – क्लोन – कार्ड बनवले जाते. यालाच तांत्रिक भाषेत क्लोनिंगम्हणतात. या कार्डच्या आधारे आपल्या खात्यातून हातोहात गुन्हेगार पैसे लांबवू शकतात.

सायबर दरोडेखोरांकडून केल्या जाणार्‍या कार्ड क्लोनिंगच्या घटना वाढीस लागल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार आता एटीएम सेंटरमध्ये आपल्याला कार्डशिवाय पैसे काढता येणार आहेत. थोडक्यात ही प्रक्रिया आता कार्डलेस होणार आहे.

सध्या काही बँका आपल्या खातेदारांना अशा प्रकारची सुविधा देत आहेत. आता त्याचे सार्वत्रिकरण करण्यात येणार आहे. म्हणजेच सर्व बँका आणि एटीएम नेटवर्कमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे. ही सुविधा युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय)च्या साहाय्याने शक्य होणार आहे. याबाबत एनपीसीआय, एटीएम नेटवर्क आणि बँकांना रिझर्व्ह बँकेकडून निर्देश देण्यात येणार आहेत.

कार्डलेस प्रणालीमुळे पारंपरिक एटीएम कार्डांची गरज आता संपुष्टात येणार आहे. तसेच क्लोनिंग, स्किमिंग यांसारख्या गैरप्रकारांनाही आळा बसणार आहे.

कशी असेल कार्डलेस प्रणाली?

* या नव्या प्रणालीचा वापर करण्यासाठी ग्राहकाकडे स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. तसेच त्यामध्ये भीम, पेटीएम, गुगल पे, फोन पे यांसारखे यूपीआय अ‍ॅप असणे गरजेचे आहे.

* एटीएम सेंटरमध्ये गेल्यानंतर मशीनवर कार्डलेस मनीचा पर्याय निवडावा लागेल.

* तिथे आपल्याला यूपीआयच्या माध्यमातून आपली ओळख देण्याचा पर्याय दिसेल. यासाठी एक क्युआर कोड दिला जाईल.

* यानंतर आपल्या मोबाईलवरील पेमेंट अ‍ॅप ओपन करून तो कोड स्कॅन करावा लागेल. यानंतर यूपीआयद्वारे त्याचे ऑथेंटिकेशन केले जाईल आणि त्यानंतर आपल्याला हव्या असलेल्या रकमेचा तपशील टाकून पैसे काढता येतील.

* हा क्यूआरकोड प्रत्येक वेळी वेगळा असल्याने तो कॉपी करता येणार नाही. परिणामी, एटीएमचे व्यवहार सुरक्षित होतील.
अर्थात ग्रामीण भागामध्ये आजही सर्वांकडे स्मार्टफोन नाहीत. ही बाब लक्षात घेऊन सुरुवातीला तरी या नव्या प्रणालीचा वापर ऐच्छिक राहणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत त्यांनी घाबरण्याची गरज नाही.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ‘आर्थिक व्यवहार सुलभ करण्यासोबतच, अशा व्यवहारांसाठी प्रत्यक्ष कार्डची आवश्यकता नसल्यामुळे कार्ड स्किमिंग आणि कार्ड क्लोनिंग यांसारख्या फसवणुकी टाळण्यास मदत होईल. पर्यायाने आर्थिक व्यवहार सहजसुलभ होतील,’ असे मत व्यक्त केले आहे. तर ‘यूपीआयद्वारे ग्राहक कोणत्याही बँकेच्या एटीएम किंवा व्हाइट-लेबल एटीएममधून पैसे काढू शकतात. आम्ही सिस्टिमिक बदल करण्यासाठी काम करत आहोत. 2-3 महिन्यांत यातल्या येणार्‍या समस्या स्पष्ट होतील, असे आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी रबिशंकर यांनी याबाबत आपले मत स्पष्ट केले आहे.

Back to top button