अण्णा द्रमुकसमोर नेतृत्वाचे संकट | पुढारी

अण्णा द्रमुकसमोर नेतृत्वाचे संकट

अण्णा द्रमुक पक्षाची स्थापना 1972 मध्ये एम. जी. रामचंद्रन यांनी केली. ते 1977 मध्ये सत्तेवर आले आणि 1987 मध्ये त्यांच्या निधनापर्यंत सत्तेवर होते. एमजीआर यांच्या निधनानंतर दक्षिण भारतीय चित्रपट रसिकांच्या गळ्यातील ताईत असणार्‍या जयललिता अण्णा द्रमुकच्या निर्विवाद नेत्या म्हणून उदयास आल्या आणि 5 डिसेंबर 2016 रोजी अंतिम श्वास घेईपर्यंत त्या पक्षात क्रमांक एकच्या नेत्या राहिल्या. याच काळात तामिळनाडू सरकारच्या एका साहाय्यक पीआरओच्या पत्नी व्ही. के. शशिकला यांनी जयललिता यांच्या जीवनात प्रवेश केला. मॅट्रिक पास असलेल्या शशिकला यांनी त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. चेन्नईच्या पोएस गार्डनमध्ये जयललिता यांच्या ‘वेद निलायम’ या बंगल्यातच शशिकला राहू लागल्या.

खरे तर, शशिकला आणि त्यांचा भाचा टीटीव्ही दिनाकरन यांना ऑक्टोबर 2011 मध्ये जयललिता यांनी ‘वेद निलायम’मधून बाहेर काढले होते. या मंडळींबरोबर कोणताही संपर्क करू नये, असे त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना बजावले. परंतु, केवळ त्यांच्या आक्का (जयललिता) यांची सेवा करण्यातच रस आहे आणि त्या राजकारणात प्रवेश करू इच्छित नाहीत, असे खुद्द शशिकला यांनी एप्रिल 2012 मध्ये जाहीर केल्यानंतर त्यांना पुन्हा जयललितांच्या बंगल्यात प्रवेश मिळाला. दिनाकरनही ‘वेद निलायम’मध्ये प्रवेश करण्यात यशस्वी ठरले. शशिकला यांनी त्यांना उपसरचिटणीस नियुक्त केले. डिसेंबर 2016 पर्यंत शशिकला यांना अण्णा द्रमुकच्या कार्यवाह सरचिटणीस पदापर्यंत पदोन्नती मिळाली.

फेब्रुवारी 2017 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत अण्णा द्रमुकच्या विधिमंडळ पक्षाने सर्वसंमतीने शशिकला यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली. शपथग्रहण समारंभ 15 फेब्रुवारीला निश्चित केला. परंतु, तत्पूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने शशिकला, त्यांचा भाचा सुधाकरन आणि चुलतभाऊ इलावरसी यांनी ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याबद्दल त्यांना दोषी मानणारा कर्नाटकच्या विशेष न्यायालयाचा निकाल ग्राह्य मानून चार वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षाही ठोठावली. ज्या दिवशी शशिकला यांना मुख्यमंत्री बनायचे होते, त्याच दिवशी मुख्यमंत्रिपद पलानीस्वामी यांच्याकडे सोपवून त्यांनी कारागृहाची वाट धरली. पलानीस्वामी यांनी कारभाराला सुरुवात केली; परंतु जयललिता यांच्या आर. के. नगर मतदारसंघातून निवडून येणे आणि पलानीस्वामी यांना पराभूत करणे हे दिनाकरन यांचे लक्ष्य होते. शशिकला जेलमध्ये असल्यामुळे पलानीस्वामी यांनी भाजपमधील आपल्या संपर्कांचा वापर पनीरसेल्वम यांना वश करण्यासाठी सुरू केला.

सप्टेंबर 2017 मध्ये एका सर्वसाधारण बैठकीद्वारे शशिकला आणि दिनाकरन यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. दिनाकरन यांनी अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम नावाचा नवा पक्ष स्थापन केला. 2021 मध्ये द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीने अण्णा द्रमुकचा पराभव केला. अण्णा द्रमुकमध्ये आणखी फूट पाडण्यासाठी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे नेते स्टॅलिन प्रयत्नशील आहेत. पलानीस्वामी यांच्या विश्वासू सहकार्‍यांवर छापेमारी सुरू आहे. आपले अस्तित्व ज्या पक्षामुळे आहे, त्या पक्षाचे नेतृत्व करण्याची ताकद शशिकला यांच्यात आहे का, हा मुख्य प्रश्न आहे.

जयललिता यांच्यासमवेत पडद्याआडच्या हालचालींमध्ये सक्रिय राहण्याव्यतिरिक्त शशिकला यांनी एक नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण केलेली नाही. जयललिता यांनी पनीरसेल्वम यांची निष्ठा पाहूनच त्यांना दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून निवडले. वस्तुतः पनीरसेल्वम यांच्याकडे पलानीस्वामी यांच्यासारखे कोणतेच गुण नाहीत, असे जयललितांचे निकटवर्तीय मानतात. अण्णा द्रमुकची सुवर्ण जयंती हाच त्या पक्षाचा अखेरचा मुक्काम ठरू शकतो. शशिकला, पनीरसेल्वम आणि दिनाकरन यांच्याकडून काहीच अपेक्षा ठेवता येत नाहीत. पलानीस्वामी यांच्या बाबतीत आशेचा किरण दिसतो. अण्णा द्रमुकचा बचाव करण्यासाठी ईश्वराने त्यांना शक्ती द्यावी, एवढेच आपण म्हणू शकतो.
2016 मध्ये जयललिता यांचे निधन झाल्यानंतर अण्णा द्रमुक पक्षाच्या नेतृत्वाचा प्रश्न सुटलेला नाही. शशिकला, पनीरसेल्वम, दिनाकरन यांच्याकडून अपेक्षा ठेवता येत नाहीत. पलानीस्वामी सुवर्ण महोत्सवी वर्षात पक्षाला वाचवू शकतील का?

– के. श्रीनिवासन

Back to top button