कारखाने वाचवायचे असतील तर उदयनराजेंना मताधिक्य द्या | पुढारी

कारखाने वाचवायचे असतील तर उदयनराजेंना मताधिक्य द्या

वाई, पुढारी वृत्तसेवा : वाई विधानसभा मतदारसंघात समोर विरोधकच नाही. जे आहेत तेही भाजपचेच काम करत आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना एक लाखाचे लीड द्या. तुम्ही माझे ऐका, तुम्ही लाखाचे लीड दिले तर मी नितीनकाका पाटील यांना जूनमध्ये खासदार नाही केले तर पवारांची औलाद सांगणार नाही, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ना. अजितदादा पवार यांनी केली. तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो. आमदारांच्या जोडीला मी एक खासदार देतो. उदयनराजेे पण खासदार असतील, नितीनकाका पण खासदार असेल. संकटातील दोन्ही कारखाने वाचवायचे असतील तर उदयनराजेंना मताधिक्य द्या. त्यांना निवडून देण्याची जबाबदारी आपली आहे, असे आवाहनही ना. अजितदादा पवार यांनी केले.

सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ वाई येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आ. मकरंद पाटील, आ. देवयानी फरांदे, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील, ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, शशिकांत पिसाळ, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अमित कदम, प्रतापराव पवार, जिल्हा बँक संचालक दत्तानाना ढमाळ, राजेंद्र राजपुरे, माजी जि.प. उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, किसनवीर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रमोद शिंदे, माजी जि.प. अध्यक्ष उदय कबुले, माजी सभापती संजूबाबा गायकवाड, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

ना. अजितदादा पवार म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ही निवडणूक जिंकायचीच आहे. राज्याचे बजेट माझ्याकडे असते. पंगत बसली की वाढपी ओळखीचा असला पाहिजे. म्हणजे जास्त मिळते त्याप्रमाणे वाई मतदारसंघाला कोट्यवधींचा निधी दिला आहे. आम्ही सर्वांना बरोबर घेवून पुढे चाललो आहे. महायुतीतील प्रत्येक पक्ष त्यांचे काम करेल. पण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कमी पडला हे पहायची वेळ येवू देवू नका. किसनवीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने नको घेवू असे मी मकरंदला सांगत होतो. डोक्यावरचे जे केस राहिलेत तेही जातील आणि आपण दोघे एकसारखे दिसू. पण तुमच्या रेट्यापुढे मकरंद आबानेे हे कारखाने घेतले. दोन्ही कारखाने कर्जबाजारी असून त्यातून मार्ग काढण्यासाठी एनसीडीसीसमोर गेलो आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्याला मदत करण्याची ग्वाही दिली आहे. यापूर्वीही अनेक आजारी कारखाने बाहेर काढले आहेत. हेही बाहेर काढणे आपल्यासाठी जड नाही. मात्र, लोकांनी त्याची जाणीव ठेवली पाहिजे. मकरंदआबा जनतेच्या अन् मी आबांच्या पाठिशी आहे. पण उदयनराजेंना लीड देण्याची जबाबदारी आपली आहे, असेही अजितदादा म्हणाले.

सातारा ही मानाची गादी आहे. खा. उदयनराजे हे सातारच्या गादीचे वारस आहेत. त्यामुळे वाई, खंडाळा, महाबळेश्वरमधून त्यांना लाखाचे लीड मिळाले पाहिजे तर सातारा-जावलीतून 1 लाखांचे लीड उदयनराजे व शिवेंद्रराजे एकत्र असताना मिळालेच पाहिजे. पालकमंत्र्यांच्या कालावधीत पाटणमध्येही चिक्कार कामे झाली आहेत. तेथेही लीड चांगले मिळाले पाहिजे, असेही अजितदादा म्हणाले.
ना. अजित पवार म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यावरही टीका झाली होती. त्यांच्याही राजकीय कारकिर्दीत चढ-उतार आले. बहुजनांच्या विकासासाठी सत्तेत असणे गरजेचे आहे. हा यशवंतरावांचा विचार असून त्याच मार्गावर मी जात आहे. त्यामुळेच मी सत्तेत सहभागी झालो. त्यांच्यासाठी भारतरत्नची मागणी करण्यात उशीर झाला असला तरी त्याचा पाठपुरावा करणार आहे. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा पुढे घेवून चाललो आहे. काहींनी सांगितले आमचा फोटो वापरायचा नाही, कोर्टात जाईन असे सांगितले. ते आमचे दैवत होते. मात्र, त्यांनी नकार दिल्याने यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरल्याचे अजितदादांनी सांगितले.

सातारा जिल्हा हा कै.यशवंतराव चव्हाण यांना मानणारा तर स्वर्गीय आबासाहेब वीर, लक्ष्मणराव पाटील, मदन आप्पा पिसाळ, बाळासाहेब भिलारे यांच्या विचारावर चालणारा जिल्हा आहे. सातारच्या गादीला मत देवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदाराला निवडून द्या, सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. उदयनराजे भोसले यांना दिलेलं मत हे मोदींचे हात बळकट करण्यासाठी आहे, असे ना. अजित पवार म्हणाले. खा. उदयनराजे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्थिरता होती व कामे होत नसल्यानेच अजितदादा व एकनाथ शिंदेंनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांचा निर्णय हा योग्यच होता. स्थिर सरकारमुळेच विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला. अजितदादांमुळे सिंचन प्रकल्प मार्गी लागले. दहा वर्षात ज्या योजना मार्गी लागल्या त्या काँग्रेसच्या कालावधीत का पूर्ण झाल्या नाहीत? महाविकास आघाडीमध्ये विसंगती व विस्कळीतपणा आहे.

1999 चे युती सरकार असताना सिंचनाचे प्रकल्प झाले. मात्र, त्यानंतर 15 वर्षे असणार्‍या सरकारमध्ये विरोधी उमेदवार जलसंपदा मंत्री होते. मात्र, त्यांनी निधीच उपलब्ध करून दिला नाही. ज्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनाच विरोधी उमेदवाराने डबर्‍यात घातले. या माध्यमातून अण्णासाहेबांच्या संघटनेला लागलेला कलंक पुसायचा आहे. एकीकडे शिष्टाचार अन् दुसरीकडे भ्रष्टाचार केला जात आहे. मार्केटमध्ये भ्रष्टाचार झाला तर खासदार झाल्यानंतर ते तुमच्या खिशात व कपाटात काहीच शिल्लक ठेवणार नाहीत, अशी टीकाही उदयनराजेंनी केली. प्रत्येकाला महत्वकांक्षा असणे स्वाभाविक आहे. अजितदादांनी नितीनकाकांना योग्य ती संधी द्यावी, अशी मागणीही उदयनराजेंनी केली.

आ. मकरंद पाटील म्हणाले, नितीन पाटील हे लोकसभेला इच्छुक नव्हते. मात्र, दादांची इच्छा होती त्यांना उमेदवारी देण्याची. महायुतीमध्ये उदयनराजेंना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. नितीनला उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले. त्यातच मी लग्नात व्यस्त असल्याने निवडणुकीचे काम झाले नाही. त्यामुळे लोकांचा गैरसमज झाला की आबाही नाराज दिसताहेत. वाई मतदारसंघात काम कधी सुरू होणार? याची विचारणा झाली. पण माझ्या मतदारसंघातील कार्यकर्ता हा विचाराने बांधला असून हा सैरभैर होणारा कार्यकर्ता नाही. माझा कार्यकर्ता चुकीचे वागणार नाही. यावेळी संजय गायकवाड, नितीन भरगुडे-पाटील, अशोक गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमोद शिंदे यांनी प्रास्ताविक केले.

Back to top button