शाहबाज शरीफ : काश्मीर प्रश्‍न सुटत नाही तोवर भारताशी संबंध सुधारणार कसे? | पुढारी

शाहबाज शरीफ : काश्मीर प्रश्‍न सुटत नाही तोवर भारताशी संबंध सुधारणार कसे?

इस्लामाबाद ; वृत्तसंस्था : शनिवार-रविवारच्या दरम्यान मध्यरात्री झालेल्या अविश्‍वास प्रस्तावावरील मतदानानंतर पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे इम्रान खान सरकार कोसळले. विरोधी पक्षांच्या आघाडीने पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) पक्षाचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांची पंतप्रधान म्हणून निवड जाहीर केली अन् लगोलग शाहबाज यांनीही तेच रागरंग उधळले.

काश्मीर प्रश्‍न सुटत नाही तोवर भारताशी संबंध सुधारणार कसे, असा इम्रान खान यांचाच राग शहबाज यांनीही आळवला. शहबाज यांनी पंतप्रधानपदासाठी आपला उमेदवारी अर्ज रविवारी दाखल केला. यानंतर त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. लगेचच इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मतदान 11 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता सुरू होईल. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते तसेच माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पुत्र बिलावल भुट्टो झरदारी यांची परराष्ट्र मंत्रिपदी निवड केली जाईल, असे संकेत आहेत.

इकडे संसद सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार उपसभापती कासिम सुरी यांनी राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे सोमवारी होणार्‍या अधिवेशनादरम्यान तेच अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडतील.

पाचदा बोहल्यावर चढलेले शरीफ

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सीता व्हाईट, विद्यमान पत्नी बुशरा, माजी पत्नी जेमिमा, माजी पत्नी रेहम अशा 4 बायका झाल्या. पाकचे भावी पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे पाच विवाह झाले आहेत.

शहबाज यांचे 5 विवाह झाले. पहिली पत्नी बेगम नुसरत यांच्यापासून शहबाज यांना 5 अपत्ये आहेत. पुढे नुसरत 1993 मध्ये मरण पावल्या. नंतर शहबाज यांनी नर्गिस खोसा यांच्याशी दुसरे लग्‍न केले. शहबाज यांनी सौदी अरेबियात आलिया हनी यांच्याशीही लग्‍न केले. आलियाला वाहतुकीत खोळंब्याचा त्रास नको म्हणून खास तिच्या घराकडे जाणार्‍या रस्त्यावर त्यांनी पूल बांधून घेतला होता. आलियापासून शहबाज यांना खदिजा नावाची कन्या आहे.

2003 मध्ये दुबई येथे तहमीना दुर्रानी हिच्याशी एका खासगी समारंभात शहबाज यांनी लग्‍न लावले. तहमीना सध्या लाहोरला राहातात. तहमीना यांनी ‘माय फ्युडल लॉर्ड’ ही आत्मकथा लिहिली.सन 2012 मध्ये शहबाज यांनी पंजाबात पोलिस अधिकारी असलेल्या एका महिलेशी लग्‍न केले. या पाचव्या बायकोचे नाव कुलसूम असल्याचे सांगण्यात येते.

Back to top button