सातारा : ‘किसन वीर’साठी सोमवारपासून अर्ज दाखल | पुढारी

सातारा : ‘किसन वीर’साठी सोमवारपासून अर्ज दाखल

सातारा : पुढारी वृत्तसेवा
भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार सोमवार, दि. 28 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. 3 मे रोजी मतदान व 5 मे रोजी निकाल लागणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून किसन वीर कारखाना बंद असल्याने आ. मकरंद पाटील व विद्यमान अध्यक्ष मदनदादा भोसले हे निवडणुकीत पॅनल टाकणार का, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

किसन वीर सहकारी साखर कारखाना बंद आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील तब्बल 5 लाख टन ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत आहे. याबाबत दै. ‘पुढारी’ने आवाज उठवल्यानंतर सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांना किसन वीरच्या कार्यक्षेत्रातील सर्व ऊस तोडण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार 9 कारखाने हा ऊस नेण्यास तयार झाले आहेत. ऊसतोडीचा प्रश्‍न निकाली निघाला असतानाच निवडणूक लागली आहे. एकीकडे कारखाना आर्थिक अडचणीत आला असताना ऊसतोडणी, शेतकर्‍यांची देणी, कामगारांची देणी, कारखाना सुरू करण्यासाठी हालचाली करणे अपेक्षित आहे.

शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे निवडणुकीसाठी घाई गडबड करू नये, अशी भूमिका ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी घेतली होती. या भूमिकेला राज्य सहकारी प्राधिकरणाने केराची टोपली दाखवत किसनवीरच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणूक कार्यक्रमाला प्राधिकरणाने अंतिम मंजुरी दिली आहे. किसनवीर कारखान्याच्या एकूण 21 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये व्यक्‍ती ऊस उत्पादक सभासद गटातून भुईंज 3, वाई व जावली 3, सातारा 3 व कोरेगाव 3 असे 15 संचालक, उत्पादक संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्र्रतिनिधी गटातून 1, अनुसूचित जाती, जमाती 1, महिला राखीव 2, इतर मागास प्रवर्ग राखीव 1, वि.जा., भ.ज. 1 असे 21 संचालक निवडले जाणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून किसनवीर सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत आहे. कारखान्याने शेतकर्‍यांची व कामगारांची कोट्यवधींची देणी दिलेली नाहीत. तसेच कारखान्यावर 800 कोटींच्या कर्जाचा बोजा आहे. त्यामुळे कारखान्याला कोणत्याच बँकेने कर्ज न दिल्याने यावर्षी कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होवू शकला नाही. कारखाना सुरू न झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, यासाठी नेतेमंडळींकडून कोणतीच कार्यवाही होत नाही. अशा वातावरणात किसनवीर कारखान्याची निवडणूक होणार आहे. त्यामुळे निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. कारखान्यावरून राजकारण करणारे आ. मकरंद पाटील व विद्यमान अध्यक्ष मदनदादा भोसले पॅनल टाकणार का? याकडे लक्ष लागले आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम
दि. 28 मार्च ते 1 एप्रिल : अर्ज दाखल करणे
दि. 4 एप्रिल : अर्जांची छाननी
दि. 5 एप्रिल : पात्र उमेदवारांची यादी
दि. 5 ते 19 एप्रिल : अर्ज माघारीची मुदत
दि. 20 एप्रिल : उमेदवारांची अंतिम यादी
दि. 3 मे : मतदान
दि. 5 मे : मतमोजणी

हेही वाचलत का ?

Back to top button