सोलापूर : एस.टी. कर्मचार्‍याची 1 लाख 43 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक | पुढारी

सोलापूर : एस.टी. कर्मचार्‍याची 1 लाख 43 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक

सोलापूर/ मंगळवेढा : पुढारी वृत्तसेवा :  आयसीआयसीआय बँक शाखा मुंबई येथून बोलत असून तुमच्या कार्डवर वार्षिक विमा 2499 रुपये आहे. तो बंद करण्यासाठी तुमच्या कार्डाची क्रेडिट लिमिट वाढवायची असल्याचे सांगून 1 लाख 43 हजार 781 रुपयांची फसवणूक केली आहे. याची लेखी तक्रार मंगळवेढा पोलिसात मंगळवेढा एस.टी. आगारात कार्यरत असलेले कर्मचारी शशिकांत लक्ष्मण महामुनी (रा. भोसे) यांनी केली आहे.

या घटनेची हकिकत अशी की, 23 मार्च रोजी सायंकाळी 5 वा. मोबाईल नं. 7587917453 वरून कॉल आला. माझे नाव राहुल अग्निहोत्री असून मी मुंबई शाखेतील आयसीआयसीआय बँकेतून बोलत आहे, असे सांगून तुमच्या कार्डावर 2499 चा वार्षिक विमा आहे. तो बंद करण्यासाठी तुमच्या कार्डाची क्रेडिट लिमिट वाढवायची असल्याचे ते म्हणाले. यावेळी महामुनी यांची जन्मतारीख, आधार नंबर व कार्डावरील नंबरसुध्दा त्याने सांगितले. त्यामुळे महामुनींनी विश्‍वास ठेऊन त्या व्यक्तीला ओटीपीची खरी माहिती दिली. खात्यावर पाच वेळा ट्रान्जॅक्शन झाल्याने पाच मेसेज प्राप्त झाले. त्यावेळी 1 लाख 43 हजार 781 रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महामुनी यांनी मंगळवेढा येथे असलेल्या आयसीआयसीआय बँकेत याबाबतची तक्रार दिली असल्याचे पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेप्रमाणेच 11 मार्च रोजी आयसीआयसीआय बँकेतून बोलत असून तुमचे कार्ड अ‍ॅक्टिव्ह करावयाचे आहे, असे सांगून ओटीपी प्राप्त करून नंदूर येथील एका महिलेस फसवून तिच्या खात्यावरील 64 हजार 640 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. या दोन फसवणुकीच्या घटनांमुळे खळबळ उडाली असून नागरिकांच्या बँकेतील पैशांची असुरक्षितता निर्माण झाली आहे. नागरिकांनी अशा फसव्या घटनांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Back to top button