सांगली : जालना घटनेच्या निषेधार्थ उद्या मंगळवारी कडेगाव तालुका बंद | पुढारी

सांगली : जालना घटनेच्या निषेधार्थ उद्या मंगळवारी कडेगाव तालुका बंद

कडेगाव; पुढारी वृत्तसेवा :  जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर  पोलिसांनी लाठीमार केला. याचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहेत.  याच पार्श्वभूमीवर कडेगाव शहर व तालुक्यात मंगळवारी (दि.५ ) बंदची हाक देण्यात आली आहे . सकाळी १० वाजता कडेगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.

जालना येथील घटनेनंतर आज (दि.४) सकल मराठा समाजाची आणि मराठा क्रांती मोर्चाची कडेगाव येथे बैठक झाली. या बैठकीत सकल मराठा समाज यांच्या वतीने तालुका बंदची हाक देण्यात आली . त्यामुळे कडेगाव शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी कडकडीत बंद पाहायला मिळणार आहेत. तर या बंदमध्ये सहभागी होऊन जिल्ह्यातील व्यापारी आणि व्यवसायकांनी सहकार्य करण्याचे आव्हान सकल मराठा समाजाकडून करण्यात आले आहे. या बंदला सर्व राजकीय पक्षांनी देखील पाठिंबा दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघणार मोर्चा

मंगळवारी सकाळी कडेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधव एकत्र येणार आहेत. तेथून निषेध मोर्चा निघणार आहे. कडेगाव येथील प्रांताधिकारी कार्यालय येथे हा मोर्चा जाणार आहे. जालना येथील घटनेच्या निषेधार्थ प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.

Back to top button