ट्रॅव्हल पॅकेज घेताय, जरा जपून; फसवणुकीची शक्यता

ट्रॅव्हल पॅकेज घेताय, जरा जपून; फसवणुकीची शक्यता

सांगली; पुढारी वृत्तसेवा : धावपळीच्या युगात थोडीफार विश्रांती मिळावी, म्हणून अनेकजण कुटुंब, मित्रासह पर्यटनस्थळांना पसंती देतात. आकर्षक व कमी खर्चाच्या टूर पॅकेजची भुरळ त्यांना पडली नसेल तर नवलच. पण जरा जपून…आकर्षक टूर पॅकेजच्या नावाखाली प्रवाशांची लूट करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे प्रवासाला जाण्यापूर्वी अधिकृत कंपन्यांकडेच चौकशी करून पर्यटनाचे नियोजन करावे.

केदारनाथ यात्रेला गेलेल्या माधवनगर येथील 23 पर्यटकांना हरिद्धारमध्ये सोडून एजंटाने पलायन केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या यात्रेकरूंनी संजयनगर पोलिस ठाण्यात एजंटाविरोधात तक्रार अर्ज दिला आहे. कौस्तुभ म्हैसाळकर या एजंटाने यात्रेकरूंची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पर्यटक, यात्रेकरूंना कमी खर्चात पर्यटनाचे आमिष दाखवून फसविल्याचे प्रकार सर्रास घडत असतात. सांगली जिल्ह्यात तर रेल्वे तिकीट काढून देण्याचे मोठे रॅकेट आहे. सांगलीतून देशाच्या कोणत्याही राज्यात, पर्यटनस्थळी जाण्यासाठी रेल्वे तिकीट काढता येते. पण अनेकदा अशी तिकीटे मिरजेतून काढण्यासाठी प्रेरित केले जाते. अगदी आठ-दहा हजारात होणार्‍या टूरसाठी 30-40 हजार रुपये घेतले जातात. अनेक एजंट तर यात्रा पूर्ण न करताच वाटेत यात्रेकरूंना सोडून निघून जात असल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे पर्यटन, धार्मिक स्थळी जाण्यासाठी अधिकृत ट्रॅव्हल कंपन्यांकडे चौकशी केली पाहिजे.

आमिषाला बळी पडू नका

टूर पॅकेजचे बुकिंग करताना पर्यटकांनी सावध राहिले पाहिजे. संबंधित कंपनीची विश्वासार्हता किती आहे, याची माहिती घ्यावी. अनेकदा कमी खर्चात पर्यटनाचे आमिष दाखविले जाते. पण पर्यटन दौर्‍यावर गेल्यावर एजंटाला खर्च परवडत नसल्याने तो पर्यटकांची फसवणूक करतो. आमिषाला बळी पडल्याने पर्यटनाच्या आनंदावर विरजण पडते – केशव राव, बालाजी ट्रॅव्हल्स

नियोजनावेळी काय खबरदारी घ्यावी

पर्यटनस्थळी जाण्यापूर्वी ट्रॅव्हल कंपन्या, एजंटाकडून पॅकेजमध्ये कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत, याची माहिती करून घ्यावी. कोणती पर्यटनस्थळे दाखविली जाणार आहेत. तेथील प्रवेश फी व इतर शुल्काची माहिती घ्यावी. रेल्वे अथवा विमानाचे तिकीट पीआरएन नंबरवरून स्वतःहून तपासून घ्यावे. ट्रॅव्हल कंपनी अथवा एजंटाची विश्वासार्हताही तपासावी. एकूणच सर्व गोष्टींची स्पष्टता झाल्याशिवाय टूर पॅकेजचे बुकिंग करू नये.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news