सांगली : राजकारणाच्या लफड्यात पडू नका; पडळकरांचा अधिकाऱ्यांना इशारा

सांगली : राजकारणाच्या लफड्यात पडू नका; पडळकरांचा अधिकाऱ्यांना इशारा

विटा; पुढारी वृत्तसेवा : अधिकाऱ्यांनो, तुम्ही वाट्टेल तशी कामे करू नका. नोकऱ्या नीट करा नाहीतर घरी जाल. राजकारणाच्या लफड्यात तुम्ही पडू नका. तुम्ही तुमच्या पध्दतीने काम करा; अन्यथा तुम्ही अडचणीत याल, अशा शब्दात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला.

विट्यात खानापूर तालुका आणि विटा शहर भाजपचा कार्यकर्ता निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, भाजपचे जिल्हा सचिव पंकज दबडे, भाजपचे अनुसूचीत जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, ऐनवाडीचे सरपंच दाजी पवार, मधुकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार पडळकर म्हणाले, सरकारी अधिकाऱ्यांनी राजकारणाशी लांब राहावे. आज जे सत्तेत आहेत, ते उद्या कदाचीत नसतील. मात्र सर्वसामान्य गोरगरीब जनतेला त्रास झालेला आम्हाला चालणार नाही. सामान्य लोकांच्या पाठिशी आम्ही उभे राहण्याची भूमिका घेऊन अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात संघर्ष करू. ज्या लोकांवर अन्याय होत आहे, ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू, असे पडळकर म्हणाले.

माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर म्हणाले, खानापूर मतदारसंघात विकासाचे राजकारण करण्याची भूमिका ठेवून आम्ही काम करत आहे. खानापूर तालुक्यातील कोणतही विकासकाम राहणार नाही. मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या पाठिशी खंबीरपणे ताकद उभी केली जाईल. या मतदारसंघातील अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. येत्या तीन महिन्यात ताकदीने काम करायचे आहे. भाजपच्या विचारांचा मतदारसंघातून आमदार झाला पाहिजे, त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे. विकासासाठी मतदारसंघाची भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

यावेळी पंकज दबडे, संतोष यादव, संदीप ठोंबरे, अनिल पाटील, माणिक शिंदे, दाजी पवार, निलेश पाटील, राहुल मंडले, हणमंत खिलारे यांची भाषणे झाली. या मेळाव्यास संतोष यादव, प्रशांत राठोड, निलेश पाटील, माणिक शिंदे, मानसिंग जाधव, विलास काळेबाग, सुंदर पाटील, राहुल मंडले, हणमंत खिलारे, यल्लापा पवार, करण जाधव, विजय जानकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन हणमंत खिलारे यांनी केले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news