Dhule News | देऊरला अतिवृष्टीमुळे नुकसानीचे संयुक्त पंचनामे त्वरित पूर्ण करा : माजी खा. डॉ. सुभाष भामरे

Dhule News | देऊरला अतिवृष्टीमुळे नुकसानीचे संयुक्त पंचनामे त्वरित पूर्ण करा : माजी खा. डॉ. सुभाष भामरे
Published on
Updated on

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक येथे वादळी पावसामुळे शेती तसेच शेतीपूरक व्यवसाय आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीचे त्वरित पंचनामे पूर्ण करून अहवाल राज्य शासनाकडे पाठवावा, तसेच संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी खा. डॉ. सुभाष भामरे, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व देऊरच्या सरपंचांसह शेतकऱ्यांनी केली. यावेळी नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे तसेच वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असा आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले.

देऊर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत आज माजी मंत्री डॉ. भामरे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदन देत त्यांच्याशी नुकसानीसह पंचनाम्यांबाबत चर्चा केली. यावेळी डॉ. भामरेंसह भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अरविंद जाधव, शंकरराव खलाणे, जिल्हा परिषद सदस्य संग्राम मराठे, भाजपचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर पाटील, अशोक सुडके, हरीश शेलार, देऊरचे सरपंच भाऊसाहेब देवरे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष जगदीश देवरे, किरण शेवाळे, प्रशांत देवरे आदी उपस्थित होते.

शेती पिकांसह घरांचे नुकसान

देऊरसह परिसरात गेल्या १३ जूनला ताशी १५० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाली. या वादळी पावसामुळे शेतशिवारातील अनेक वीजखांब तारांसह जमीनदोस्त झाले. तसेच शेतांतील घरे, कांदाचाळी, पोल्ट्री फार्मच्या छतावरील पत्रे उडून गेले. नुकतीच लागवड केलेल्या कपाशीसह अनेक पिकांचे बियाणे अतिवृष्टीमुळे वाया गेले. कांदा चाळींमध्ये पाणी शिरून कांदा खराब झाला. शेतांमध्ये बांधलेली दुभती जनावरे, बैलही मृत्युमुखी पडले. पोल्ट्री फार्मधील अनेक कोंबड्यांचीही प्राणहानी झाली. देऊर बुद्रुक येथील जोगडे वस्तीत उमराड नाल्याच्या पुराचे पाणी शिरून तेथील रहिवाशांच्या घरांसह संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. या सर्व नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण, करावेत, वीजखांब त्वरित उभारून वीजपुरवठा सुरळीत करावा, शेतकऱ्यांसह जोगडे वस्तीतील रहिवाशांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, नव्याने पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे, आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

अधिकाऱ्यांना पंचनाम्यांचा आदेश

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, नायब तहसीलदार संजय पवार, वीज महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता भामरे उपस्थित होते. भामरे यांनी वादळामुळे देऊर शिवारातील ५१ वीजखांब जमीनदोस्त झाल्याचे सांगितले. त्यातील ३५ खांब नव्याने उभारले असून, उर्वरित वीजखांब उभारणीचे कामही युद्धपातळीवर सुरू असून लवकरात लवकरच वीजपुरवठा सुरळीत केला जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच नायब तहसीलदार पवार यांनीही उर्वरित पंचनामे त्वरित पूर्ण केले जातील, असे सांगितले. पंचनाम्यांची कार्यवाही सुरू असून, देऊरसह अन्य गावांतील नुकसानीचीही माहिती घेतली जात असून, त्याबाबतही पंचनामे केले जातील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गावंडे यांनी दिली. यावर जिल्हाधिकारी गोयल यांनी लवकरात लवकर कृषी व महसूल विभागाने संयुक्त पंचनाम्यांची कार्यवाही पूर्ण करून नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा, संबंधित शेतकऱ्यांना भरपाईसाठी तत्पर राहावे, असा आदेश दिला.

हेही वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news