सांगली : सोन्याऐवजी लोखंडाचे बिस्कीट देऊन २५ लाख रुपयांना गंडा! | पुढारी

सांगली : सोन्याऐवजी लोखंडाचे बिस्कीट देऊन २५ लाख रुपयांना गंडा!

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सोन्याचे बिस्कीट देतो, असे सांगून लोखंडाचे बिस्कीट देऊन सुमारे 25 लाख रुपये रोख घेऊन पोबारा करण्यात आला. कोल्हापूर रस्त्यावरील विष्णूअण्णा फळ मार्केटजवळ मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. गुन्हे अन्वेषण विभागाने या गुन्ूह्याचा अवघ्या 24 तासांत छडा लावत चौघांना अटक केली. त्यांच्याकडून साडेबारा लाखाची रोकड जप्त केली. टोळीचा मुख्य सूत्रधार अशोक रेड्डी फरारी आहे. पुणे येथील व्यापारी मयूर सुभाष जैन (39) असे फसवणूक झालेल्या व्यापार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी पाच जणांविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

प्रशांत भुजंगराव निंबाळकर ( 48, रा. नांदूर जि. बुलढाणा), प्रविण महादेव खिराडे (37, तायडे कॉलनी, खामगाव, जि. बुलढाणा), मानसी सुरेश शिंदे (30) व नम्रता शरद शिंदे (28, दोघे रा. सारोळा, ता. मुळशी, सध्यशासध्या कोथरुड, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
जैन पुण्यातील मोतीबाग येथे सुमंगल अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांची संशयित रेड्डी यांच्याशी काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. त्याने स्वस्तात सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखविले. हातात मावेल, असे बिस्कीट 25 लाख रुपयाला देतो, असे त्याने सांगितले होते. खरेदीचा हा व्यवहार पुण्यात न करता सांगलीत करूया, तेथेच बिस्कीट आहे, असेही तो म्हणाला.

खरेदीचा व्यवहार 20 जूनरोजी करण्याचे ठरले. त्यानुसार जैन त्यांचे मित्र सचिन काळभोर, सुनील चव्हाण व हर्षद बेदमुथा यांना घेऊन कारने सांगलीत आले. रेड्डी याने या सर्वांना कोल्हापूर रस्त्यावर विष्णूअण्णा फळमार्केटजवळ बोलावून घेतले. रेड्डीसोबत त्याचे पाच साथीदार होते. त्याने जैन यांना बिस्कीट दिले. या बदल्यात त्यांच्याकडून 25 लाख रुपये घेतले. ही रोकड घेऊन तो साथीदारांसह पसार झाला.

जैन यांनी सराफाला बिस्कीट दाखविले. सराफाने सोन्याचे नसून धातूचे असल्याचे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जैन यांनी रेड्डीला मोबाईलवर संपर्क साधला, मात्र तो बंद लागला. त्यानंतर रात्री उशिरा जैन यांनी शहर पोलिस ठाणे गाठले.
पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, याची तपासणी केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशाणदार, हवालदार संदीप नलवडे, संदीप गुरव यांच्या पथकाने अटकेची कारवाई केली.

Back to top button