संजय राऊत यांच्याविरोधात काँग्रेस नेता आक्रमक; लेखी तक्रारीचा इशारा | पुढारी

संजय राऊत यांच्याविरोधात काँग्रेस नेता आक्रमक; लेखी तक्रारीचा इशारा

राजेंद्र उट्टलवार

नागपूर: लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतरही भाजप नेते नितीन गडकरी यांचीच प्रशंसा करायची होती. तर त्यांच्यासोबत वेगळा पक्ष काढून आघाडी करायची होती. याचा अर्थ तुम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळला की नाही ? काहीही उठसुठ बोलायचे या विरोधात आपण थेट काँग्रेस हायकमांडकडे तक्रार करणार असल्याचा इशारा शहर काँग्रेसचे अध्यक्ष व नागपुरातील काँग्रेसचे लोकसभा उमेदवार, आमदार विकास ठाकरे यांनी दिला आहे.

विकास ठाकरे संजय राऊत यांच्याविरोधात आक्रमक का?

  • खासदार संजय राऊत यांनी ‘रोखठोक’ मधून सडेतोड भूमिका व्यक्त केली.
  • नितीन गडकरींच्या पराभवासाठी आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रसद मिळाल्याचा राऊतांचा दावा
  • संजय राऊत यांनी पुराव्यानिशी बोलावे, उगाच वायफळ बडबड करू नये,
  • दुसऱ्यांच्या पैशांवर निवडणूक लढण्याची मला काहीही गरज नाही.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’त लिहिलेल्या ‘रोखठोक’ मधून सडेतोड भूमिका व्यक्त केली आहे.  राऊत यांना सतत भाजपतील अंतर्गत वादावर बोलण्याची जबाबदारी दिली आहे का ?  गडकरींच्या पराभवासाठी आपल्याला गडकरी विरोधकांकडून अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रसद आली असे बोलण्याचा, लिहिण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? जे बोलायचे ते त्यांनी पुराव्यानिशी बोलावे, उगाच वायफळ बडबड करू नये,  दुसऱ्यांच्या पैशांवर निवडणूक लढण्याची मला काहीही गरज नाही. ही माझी नववी निवडणूक आहे, अशा शब्दांत त्यांनी  संजय राऊत यांना खडे बोल सुनावले.

 महाविकास आघाडीतील एक पक्ष आघाडीचा धर्म न पाळता आपल्याच लोकांची कोंडी करीत असेल. तर शेवटी काँग्रेसनेही त्याचा गांभीर्याने विचार करावा. आपण या सर्व प्रकारांबद्दल काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेंनिथला यांच्याकडे आजच लेखी तक्रार करणार असल्याचे विकास ठाकरे यांनी ‘पुढारी’ शी बोलताना सांगितले.

हेही वाचा 

Back to top button