बीड : मांजरा प्रकल्पाच्या आधुनिकीकरण कामासाठी निधी मंजूर 

Beed News
Beed News
Published on
Updated on

केज, सुहास चिद्रवार / गौतम बचुटे : ४० वर्षे जुन्या झालेल्या देशातील मोठ्या प्रकल्पांच्या दुरुस्तीचे काम केंद्र सरकारने हाती घेतले आहे. त्यात मांजरा प्रकल्पाच्या दरवाजे व इतर दुरुस्तीचे काम करून घेण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे लक्षात घेत "ड्रिप टू " या योजनेअंतर्गत यांत्रिकी, विद्युत व स्थापत्य अशा तिन्ही कामाला मंजुरी देत २९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सध्या धरणाच्या दरवाजाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु असून इतर कामेही लवकरच सुरु होणार आहेत.

२९ कोटी रुपयांचा निधी मंजूर 

बीड, लातूर, धाराशिव या तिन्ही जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या धनेगाव (ता. केज) येथील मांजरा प्रकल्पात गतवर्षी धरण क्षेत्रात व परिसरात अपेक्षित पाऊस न झाल्याने धरणात केवळ २८ दलघमी इतका पाणी साठा वाढला होता. परिणामी, मे महिन्यात धरणातील जिवंत पाणी साठा संपला असून धरणातील पाणी हे आता जोत्याखाली गेले आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजे दुरुस्ती व इतर दुरुस्तीची कामे करणे सुलभ झाले आहे. म्हणून दुरुस्ती करण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे लक्षात घेत केंद्र सरकारने धरणाच्या दुरुस्ती व अपग्रेडेशनसाठी २९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. Beed News

भिंतीची उंची अर्धा मीटर वाढविण्याच्या कामास सुरुवात

यंदा केंद्र सरकारने देशातील ४० वर्षे व त्यापेक्षा अधिक कालावधी झालेल्या धरणांच्या दुरुस्तीची मोहीम हाती घेतली आहे. यात "ड्रीप वन" अंतर्गत केरळ व अन्य राज्यातील धरणांची दुरुस्ती झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्यातील "ड्रिप टू" अंतर्गत महाराष्ट्रातील काही धरणांच्या दुरुस्ती व आधुनिकीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये मांजरा प्रकल्पाचा समावेश असून या मंजूर झालेल्या २९ कोटी रुपयांच्या निधीतून सध्या धरणाच्या दरवाज्यांची साफसफाई, कलर काम, रबरसील बसवणे, मोटार दुरुस्ती, उजव्या व डाव्या अशा दोन्ही कालव्याच्या गेटची दुरुस्ती ही कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. ही कामे पूर्ण होताच दरवाजे यांत्रिक पद्धतीने उचलणाऱ्या "स्काडा " प्रणालीचे काम करण्यात येणार आहे. तसेच धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यापूर्वी समोरच्या भागातील गावांना सूचना देण्यासाठी अलार्म सिस्टम व धरण परिसराचे सुशोभीकरण अंतर्गत लाईटिंगचे कामही करण्यात येणार आहे.

ही कामे पूर्ण होताच स्थापत्य कामांतर्गत धरणाच्या भिंतीची उंची अर्धा मीटर वाढविण्याच्या महत्वपूर्ण कामास सुरुवात होणार आहे. धरणाच्या दरवाज्यांची उंची यापूर्वीच अर्धा मीटरने वाढविण्यात आल्याने भिंतीची उंची वाढविण्याचे काम जलदगतीने करता येणार आहे. धरणक्षेत्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने धरणाच्या समोरील बाजूने संरक्षक भिंतीचे काम ही या निधीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच सुसज्य असे कार्यालय इमारत देखील उभारण्यात येणार आहे.  एकूणच धरण क्षेत्रातील पाणीपातळी कमी असल्याकारणाने या प्रकल्पाच्या दुरुस्ती व अपग्रेडेशनची संधी मिळाल्याने धरणाची लाइफदेखील वाढण्यास मदत मिळणार आहे. Beed News

प्रकल्पाचे आधुनिकीकरण महत्वाचे ठरणार 

प्रकल्पातील पाणीपातळी कमी होणे चिंताजनक असले तरी यामुळे प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम हाती घेता आले आहे. कारण ही कामे वेळोवेळी होणेही गरजेचे आहे. धरणाची निर्मिती होऊन ४० वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने या निधीतून प्रकल्पाचे आधुनिकीकरण होणे ही महत्वपूर्ण ठरणारे आहे.
सूरज निकम (शाखाधिकारी, मांजरा प्रकल्प, धनेगाव ता. केज.)

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news