विराटने BCCI कडे केली ‘मिनी ब्रेक’ची विनंती, T20 World cup मधील ‘या’ सामन्‍याला मुकणार? | पुढारी

विराटने BCCI कडे केली 'मिनी ब्रेक'ची विनंती, T20 World cup मधील 'या' सामन्‍याला मुकणार?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2024) स्‍पर्धेनंतर भारताचा स्‍टार फलंदाज विराट कोहली आता अमेरिका आणि वेस्‍ट इंडिज येथे होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी सज्‍ज झाला आहे. मात्र त्‍याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) विश्रांती साठी मिनी ब्रेक मिळावा अशी विनंती केली आहे.

बांगलादेशविरुद्धच्‍या सराव सामन्याला मुकणार?

यासंदर्भात ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटलं आहे की, विराट कोहलीने आयपीएल स्‍पर्धेनंतर होणार्‍या टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेपूर्वी विश्रांतीसाठी मिनी ब्रेकची विनंती केली आहे. त्‍यामुळे तो T20 विश्वचषकातील बांगलादेशविरुद्धच्‍या सराव सामन्याला मुकण्‍याची शक्‍यता आहे.

३० मे रोजी न्यू यॉर्कला रवाना होण्याची अपेक्षा

अमेरिका आणि वेस्‍ट इंडिज येथे होणार्‍या टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेत १ जून रोजी भारताचा सराव सामना हा बांगलादेशविरुद्ध होणार आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाची पहिली तुकडी शनिवारी रात्री न्यूयॉर्कला रवाना झाली आहे. रोहितसोबत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हेही मुंबई विमानतळावर दिसले. मात्र विराट कोहली पहिल्‍या तुकडी नव्‍हता. विराट कोहलीला ३० मे रोजी न्यू यॉर्कला रवाना होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे १ जून रोजी होणाऱ्या सराव सामना खेळणार नाही, अशी शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

विराटच्‍या विनंतीला बीसीसीआय दर्शवली सहमती

उशीरा संघात सामील होणार असल्‍याचे त्‍याने आम्‍हाला कळवले आहे. तो 30 मे रोजी पहाटे न्यूयॉर्कला जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआय त्याच्या विनंतीला सहमती दर्शवली आहे, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

अमेरिका आणि वेस्‍ट इंडिज यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने २ जून ते २९ जून या कालावधीत टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्‍पर्धेत भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. ९ जून रोजी न्यूयॉर्कमधील काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्‍तान आमने-सामने असणार आहेत.

Back to top button