सांगली : समृद्ध, सुदृढ पिढीसाठी झोकून द्या : इंद्रजित देशमुख | पुढारी

सांगली : समृद्ध, सुदृढ पिढीसाठी झोकून द्या : इंद्रजित देशमुख

वाळवा ः पुढारी वृत्तसेवा :  क्रांतिकारकांना घडविणार्‍या मातांच्या त्यागाची आठवण ठेवून सर्वांनी समृद्ध आणि सुदृढ नवी पिढी घडविण्यासाठी झोकून देणे गरजेचे आहे. अन्यथा, भविष्यात फारच भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे, असा इशारा ज्येष्ठ विचारवंत इंद्रजित देशमुख यांनी दिला. वाळवा येथे क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांच्या 33 व्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा संकुलाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी अध्यक्षस्थानी होते.

देशमुख म्हणाले, जो आईवर प्रेम करतो तोच राष्ट्रावर प्रेम करू शकतो. क्रांतिमातांना वीर पुत्राचे डोहाळे लागले होते. आज मुलांवर आपल्या इच्छा लादून नोटा छापण्याचे मशीन तयार करीत आहोत. मुलांच्या क्षमतांचा विकास करून नवी पिढी घडविणे गरजेचे आहे. सत्व आणि तत्व यांनी भरलेला देश घडला पाहिजे. क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात संघर्षाचे जीवन जगले तर स्वातंत्र्यानंतर विधायक चळवळीत अखेरपर्यंत जगल्या.

वैभवकाका नायकवडी म्हणाले, स्वातंत्र्य चळवळ जेवढी महत्त्वाची होती, तेवढीच नव्या पिढीवर सुसंस्काराची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने शक्य त्या मार्गाने कार्यरत राहावे, हेच देश उभारणीचे सर्वात मोठे काम आहे. प्रा. राजा माळगी यांनी प्रास्ताविक केले. क्रांतिमातेच्या स्मरणार्थ शिवाजी तांदळे व भागिर्थी तांदळे यांचा कामगार पतसंस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी मुख्याध्यापिका विशाखा कदम, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष महादेव कांबळे, दिनकर बाबर, दूध संघाचे उपाध्यक्ष भगवान पाटील, बझारच्या कार्यवाह नंदिनी नायकवडी, प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, वीरधवल नायकवडी, वसंत वाजे, यशवंत बाबर उपस्थित होते. मुख्याध्यापिका व्ही. के. चेंडके यांनी आभार मानले.

हेही वाचलंत का? 

Back to top button