स्वारगेट स्थानक अपुरे; रोज 2600 बसची ये-जा; परिसरात रोजच होतेय वाहतूक कोंडी | पुढारी

स्वारगेट स्थानक अपुरे; रोज 2600 बसची ये-जा; परिसरात रोजच होतेय वाहतूक कोंडी

प्रसाद जगताप

पुणे : राज्यातील विविध जिल्ह्यांतून स्वारगेट स्थानकात येणार्‍या एसटीच्या गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, येथे बस गाड्यांचीच प्रचंड कोंडी होत असून, गाड्या उभ्या करण्यासाठी स्वारगेट स्थानक अपुरे पडत आहे. स्वारगेट एसटी डेपोच्याच भरपूर गाड्या आहेत. आणि पुणे विभागासह इतर जिल्ह्यातील बस गाड्यादेखील येथे प्रवासी सोडण्यासाठी आणि नेण्यासाठी येत असतात. परराज्यात विशेषत: कर्नाटकमध्ये जाणार्‍या बसगाड्यांचेसुध्दा येथे येणे-जाणे असते.

त्यामुळे एसटीच्या स्वारगेट स्थानकावर बस गाड्यांचा भार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परिणामी, स्थानकात सकाळ आणि सायंकाळी गाड्यांची भरपूर गर्दी दिसते. दुपारच्या सुमारास येथे थोडी गाड्यांची गर्दी कमी असते. मात्र, सणासुदीच्या दिवशी दुपारीसुध्दा स्वारगेट स्थानक फुल्ल असल्याचे दिसते. त्यामुळे एसटी प्रशासनाने येथील गाड्यांचे नियोजन करून, येथील गाड्यांची गर्दी कमी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

अशी आहे सद्यस्थिती
स्वारगेट स्थानकात ये-जा करणार्‍या गाड्या 2 हजार 600
स्वारगेट स्थानक परिसर – 8 एकर
गाड्यांच्या पार्किंगसाठी वापर होणारी जागा – 6 एकर
उर्वरित दोन एकरमध्ये – मेंन्टनन्स डेपो, कार्यालये, पेट्रोल पंप, दुचाकी पार्कींग

आगामी काळात समस्या भीषण
सध्याच्या काळातच एसटी स्थानकामध्ये पिकअवरमध्ये गाड्यांची कोंडी होत असून, गाड्या उभ्या करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाहीत. आणि आता त्यात भर म्हणजे लवकरच एसटीच्या पुणे विभागाच्या ताफ्यात नव्या इलेक्ट्रिक शिवाई आणि शिवनेरी गाड्यादेखील दाखल होणार आहेत. त्यामुळे येथे आगामी काळात गाड्यांच्या पार्कींगचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. याकडे लक्ष देऊन प्रशासनाने योग्य ते नियोजन करण्याची आता गरज निर्माण झाली आहे.

Back to top button