सूर्यावर उठली उंचच उंच वावटळ! | पुढारी

सूर्यावर उठली उंचच उंच वावटळ!

वॉशिंग्टन : सूर्याच्या पृष्ठभागावरून 19 हजार किलोमीटर उंचीची प्लाज्माची अनोखी वावटळ उठलेली पाहण्यात आले. या घटनेला ‘सोलर टोर्नेडो’ असे म्हटले जाते. ही घटना अमेरिकेतील इलिनोइसच्या नेपरविलेतील अ‍ॅस्ट्रोफोटोग्राफर अपोलो लास्की यांनी आपल्या कॅमेर्‍यात कैद केले आहे.

एका व्हिडीओत सूर्याच्या पृष्ठभागावरून ही सौर वावटळ वर उडत असताना पाहायला मिळतात. या वावटळीची उंची सुमारे 19,312 किलोमीटर होती. लास्की यांनी 21 जून रोजी ही घटना रेकॉर्ड केली होती. असे उत्सर्जन हे ‘सोलर स्ट्रॉम सिस्टीम’चा म्हणजेच सौरवादळांचा एक भाग आहे. मात्र, या वावटळीचा आकार इतका मोठा आहे की आजुबाजूला पृथ्वीसारखा ग्रह असता तर तिने या ग्रहाला सहज गिळंकृत केले असते.

या इजेक्शनची दिशा पृथ्वीकडे नाही ही एक दिलासादायक बाब आहे. या वावटळीतील बहुतांश प्लाज्मा सूर्याच्या पृष्ठभागावर पुन्हा पडला. प्लाज्माचा अन्य भाग अंतराळात फेकला गेला. व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी लास्की यांनी एका सोलर टेलिस्कोपचा वापर केला होता. वर्तुळाकार चुंबकीय संरचनांमुळे अशा सोलर टोर्नेडोचा जन्म होतो.

Back to top button