निष्ठावंत लोकसेवक हरपला : नाना पटोले यांच्याकडून पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली | पुढारी

निष्ठावंत लोकसेवक हरपला : नाना पटोले यांच्याकडून पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली

पुढारी ऑनलाईन डेस्क : करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांच्या अकस्मित निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक असून, एक निष्ठावंत आणि कर्तव्यनिष्ठ लोकसेवक काळाच्या पडद्याआड गेला आहे. अशा शोक भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

पक्षवाढीत मोठे योगदान

पी. एन. पाटील यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून नाना पटोले म्हणाले की, पी. एन. पाटील यांनी तरुण वयापासून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली शेवटच्या श्वासापर्यंत ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी २२ वर्ष कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटना वाढवण्याचे काम केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी पक्षवाढीत मोठे योगदान दिले होते. ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी आहेत. जिल्हा बँकेचे संचालक आणि अध्यक्ष, गोकुळ दुध संघाचे संचालक म्हणून त्यांनी जिल्ह्याच्या सहकार आणि कृषी क्षेत्रात भरीव कार्य केले.

सहकाराच्या माध्यमातून शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. पी. एन. पाटील हे कार्यकर्ते आणि जनतेमध्ये रमणारे नेते होते. प्रत्येकाच्या अडचणीच्यावेळी हाकेला धावून जाणारे अशी त्यांची ओळख होती. त्यांनी कायमच सर्वसामन्य माणूस केंद्रबिंदू माणून राजकारण केले. राजकारणासोबतच, कृषी, सहकार, शिक्षण व क्रीडा क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या निधनामुळे कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. पी. एन. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पाटील कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

हेही वाचा 

 

Back to top button