‘येळकोट येळकोट जय मल्हार’ : जेजुरीत दोन लाख भाविक | पुढारी

‘येळकोट येळकोट जय मल्हार’ : जेजुरीत दोन लाख भाविक

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : ‘सदानंदाचा येळकोट,’ ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, असा जयघोष करीत आणि भंडार्‍याची उधळण करीत सोमवती यात्रेनिमित्त सुमारे दोन लाख भाविकांनी जेजुरीगडावर खंडेरायाचे दर्शन घेतले. सोमवारी (दि. 8) दुष्काळी परिस्थिती आणि रखरखता उन्हाळा असला तरी सोमवती यात्रेला भाविकांची संख्या मोठी होती. जेजुरीच्या श्रीखंडोबा देवाच्या दर्शनसाठी रविवार (दि. 7) पासूनच भाविकांची मोठी गर्दी जेजुरीत दिसून येत होती. सोमवारी दुपारी 1 वाजता प्रमुख वतनदार इनामदार पेशवे, माळवदकर व खोमणे पाटील यांनी आदेश दिल्यानंतर उत्सवमूर्तींसह पालखी सोहळ्याने गडावरून प्रस्थान ठेवले.

या वेळी जेजुरी देवसंस्थानच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून सोहळ्याला सलामी देण्यात आली. देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अनिल सौंदडे, डॉ. राजेंद्र खेडेकर, अ‍ॅड. पांडुरंग थोरवे, मंगेश घोणे, पोपट खोमणे, अभिजित देवकाते, विश्वास पानसे, श्रीखंडोबा पालखी सोहळा खांदेकरी, मानकरी, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे व सर्व पदाधिकारी, शहरातील अठरापगड जाती-धर्मांतील समाजबांधव, ग्रामस्थ, पुजारी, सेवेकरी, मानकरी, खांदेकरी उपस्थित होते. पालखी सोहळ्यासमोर मानाचा पंचकल्ल्यांनी अश्व, छत्रचामरे-अब्दागिरी, घडशी समाजबांधवांचा सनईचा मंगलमय सूर निनादत होता. जेजुरीकर मानकरी-खांदेकरी पुजारीवर्गाच्या समवेत पालखी सोहळा गडप्रदक्षिणा करून पायरी मार्गाने मल्हार गौतमेश्वर-छत्रीमंदिर येथे स्थिरावत धालेवाडी मार्गे कऱ्हा स्नानासाठी मार्गस्थ झाला. धनगर समाजबांधवांच्या वतीने पालखी सोहळा मार्गावर लोकर अंथरण्यात येत होती.

दुष्काळीस्थिती, रखरखत्या उन्हात श्रीखंडोबा देवाचा पालखी सोहळा जेजुरी गडावरून निघाला. सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असणार्‍या कर्‍हा नदीवर अनवाणी पायाने खंडोबा देवाच्या पालखी खांद्यावर घेऊन खांदेकरी, मानकरी अतिशय निस्सीम श्रद्धेने देवाची सेवा करत होते. सायंकाळी पावणेसहा वाजता मावळत्या सूर्याच्या साक्षीने कऱ्हा नदीतीरी पापनाश तीर्थावर (रंभाई शिंपीन कट्टा) श्रीखंडोबा-म्हाळसा उत्सवमूर्तींना विधिवत अभिषेक करीत कऱ्हा स्नान घालण्यात आले. या वेळी हजारो भाविकांनी उत्सवमूर्तींबरोबर स्नानाची पर्वणी लुटली. कर्‍हा नदीवर समाजआरती झाल्यानंतर परतीच्या मार्गावर धालेवाडीकरांचा मानपान घेत दवणेमळा येथे फुलाईमाळीन कट्ट्यावर विसावा घेत सोहळा जेजुरीनगरीची ग्रामदैवता जानाई मंदिर येथे स्थिरावला.

रात्री उशिरा महाद्वारमार्गे पालखी सोहळा गडावर दाखल झाला. रोजमारा वाटप होऊन सोहळ्याची सांगता झाली. सोमवती यात्रेनिमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून यात्रेपूर्वीच नियोजन करण्यात आले होते. मुख्य गड मार्गावरील पथारीवाले-विक्रेत्यांची अतिक्रमणे हटविण्यात आली होती. शहरात वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. राज्य मार्गावर वाहतूक पोलिसांसह विद्यालयीन युवक मित्रांची मदत घेतल्यामुळे वाहतूक कोंडी झाली नाही. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक संजय जाधव, सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या नियोजनाखाली 14 अधिकारी आणि 170 कर्मचारी तैनात होते. शहरातील मुख्यमार्गांवर खेळणी, प्रसादपुडे, भंडारा-खोबरे, हार-फुले, नारळ, मेवामिठाईची दुकाने सजली होती.

हेही वाचा

Back to top button