आमदार रेवण्णांना अटक | पुढारी

आमदार रेवण्णांना अटक

बंगळूर, पुढारी वृत्तसेवा : घरकाम करण्यासाठी येणार्‍या महिलेचा लैंगिक छळ आणि अपहरण केल्याच्या तक्रारीवरून माजी मंत्री आणि आमदार एच. डी. रेवण्णा यांना विशेष तपास पथकाने (एसआयटी) शनिवारी (दि. 4) सायंकाळी अटक केली. खासदार प्रज्वल यांनाही अटक करण्याची सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे.

महिलेच्या अपहरणप्रकरणी स्वतंत्र तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यामुळे आ. रेवण्णा यांनी अटकपूर्व जामिनासाठी लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. शनिवारी दुपारी 3 ते सायंकाळी 4.30 पर्यंत त्यांच्या जामिनावर युक्तिवाद झाला. न्यायमूर्ती संतोष गजानन भट यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेऊन 6.30 वाजता रेवण्णांचा अर्ज फेटाळला.

युक्तिवाद

आ. रेवण्णा यांच्या वकिलांनी विशेष तपास पथकाकडून जारी केलेल्या नोटिसीला आक्षेप घेतला. सदर नोटीस पाहिली तर एसआयटीकडून त्यांना अटकच करण्यात येणार आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीन द्यावा, अशी विनंती त्यांनी केली. त्यावर विशेष प्रॉसिक्युटर बी. एन. जगदीश म्हणाले, संशयित हे राजकीयद़ृष्ट्या बलाढ्य नेते आहेत. ते माजी मंत्री होते. विद्यमान आमदार आहेत. तक्रारदार महिलेची रक्षा करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे, त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने रेवण्णांचा जामीन अर्ज फेटाळला.

अपहृत महिला सापडली

29 एप्रिलरोजी होळेनरसीपूरची महिला बेपत्ता झाली होती. रेवण्णा यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या महिलेचा पत्ता लागला असून, ती रेवण्णा यांचे निकटवर्तीय राजशेखर यांच्या फार्म हाऊसवर सापडली. तिथेच तिला जखडून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी तिची सुटका केली. प्रकरणातील दुसरे संशयित सतीशबाबूला 2 मे रोजी एसआयटीने अटक केली होती. त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

Back to top button