दु्र्दैवी ! स्कॉर्पिओची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू | पुढारी

दु्र्दैवी ! स्कॉर्पिओची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे/खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : पानशेत रस्त्यावर डोणजे चौकाजवळील पेट्रोल पंपासमोर मद्यधुंद पर्यटकाच्या स्कार्पिओने दुचाकीला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. अपघातात त्याची पत्नी गंभीर जखमी झाली असून त्यांचे दीड वर्षाचे बालक सुदैवाने वाचले. गणेश रामचंद्र जावळकर (वय 38, रा. खानापूर, ता. हवेली) असे दुचाकीचालकाचे नाव आहे.
गणेशची पत्नी मेघा जावळकर (वय 32) गंभीर जखमी झाली. त्यांचा दीड वर्षाचा मुलगा श्रेयस याचे प्राण वाचले.

जोरदार धडक झाल्यानंतर रस्त्यावर कोसळूनही श्रेयस याला दुखापत झाली नाही. या प्रकरणी हवेली पोलिसांनी मद्यधुंद पर्यटक भुषण सुभाष देशमुख (वय 37, रा. कोंढवे धावडे, एनडीए रोड, पुणे) याला अटक केली. हा अपघात रविवारी (दि.7) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विकास अडागळे तपास करत आहेत. गणेश गुढीपाडवा सणाच्या खरेदीसाठी पत्नी व मुलासोबत दुचाकीवरून नांदेड सिटी येथे गेला होता. तेथुन कपडे, बाजारहाट करून तिघेजण खानापूर येथे परत जात होते. गणेशच्या मागे पत्नी, मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे.

सुटीच्या दिवशी मद्यधुंद पर्यटकांचा हैदोस

सुटीच्या दिवशी मद्यधुंद पर्यटकांची सिंहगड, पानशेत भागातील हाँटेल, ढाब्यावर कायम हैदोस सुरू असतो. हाँटेल, ढाबे बेकायदा दारू विक्रीचे अड्डे बनले आहेत. स्कार्पिओ चालक व त्याचे साथीदार मद्यधुंद अवस्थेत सुसाट वेगाने गाडी चालवत होते. मेघा दुचाकीवर मागे लहान मुलाला मांडीवर घेऊन बसल्या होत्या. डोणजे येथील पेट्रोल पंपाजवळ चढावावर समोरून आलेली वेगवान स्कार्पिओ पाहून त्या जोरात ओरडल्या. गणेश दुचाकी चालवत होता. वेगवान स्कॉर्पिओने दुचाकीला जोरदार धडक दिली. स्कार्पिओ चालक भुषण देशमुख याने मद्यपान केले असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा

Back to top button