भूमाफियाची दहशत ! अनेकांना घातला शेकडो कोटींचा गंडा | पुढारी

भूमाफियाची दहशत ! अनेकांना घातला शेकडो कोटींचा गंडा

सीताराम लांडगे

लोणी काळभोर : पाच महिन्यांत पैसे दुप्पट करून देतो, असे आमिष दाखवून पूर्व हवेलीतील एका भूमाफियाने अनेकांना शेकडो कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. पूर्व हवेलीतील रिंगरोड भूसंपादनाचे पैसे मिळालेले शेतकरी, काही सरकारी अधिकारी, उद्योगपती यांचा फसवणूक झालेल्यांमध्ये समावेश आहे. दुप्पटचा परतावा तर सोडाच, दिलेले मुद्दलही परत मिळत नसल्याने पूर्व हवेलीतील अनेक शेतकर्‍यांनी त्या भूमाफियाचा फोटो समाज माध्यमावर स्टेटसला ठेवून पैसे मिळावे म्हणून ‘देव’ असा उल्लेख केलेला आहे. शेकडो तरुणांचे स्टेटस पूर्व हवेलीत चर्चेचा विषय झाला आहे. पाच महिन्यांत दुप्पटच्या फंड्याला फक्त शेतकरीच नाही, तर अनेक मोठे उद्योजक व शासकीय अधिकारी भुलले असून, काळा पैसा या भूमाफियाकडे गुंतवणूक केला आहे.

पूर्व हवेलीतून रिंगरोड गेल्याने अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी बाधित झाल्या, याचा मोबदला रेडीरेकनरच्या पाच पट मिळाला. तालुक्यातील जमिनीचे दर सोन्याच्या भावापेक्षा जास्त असल्याने कोट्यवधी रुपये शेतकर्‍यांच्या थेट बँकेच्या खात्यात जमा झाले. तालुक्यातील शेतकर्‍यांना पाच कोटीपासून ते पन्नास कोटींपेक्षा जास्त किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त ही रकमा भूसंपादन पोटी मिळाल्या असल्याने शेतकर्‍यांना काही सुचेनासे झाले आहे. अनेक दिवसांपासून या रिंगरोडच्या जमिनी घेणार्‍या एका बड्या भूमाफियाने या भागात योजना आणली. माझ्याकडे पैसे गुंतवा पाच महिन्यांत दुप्पटचा परतावा देतो म्हणून अनेक शेतकर्‍यांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक त्याच्याकडे केली.

भूमाफिया बडा असल्याने त्याची राजकीय नेत्याकडे व अधिकार्‍यांकडे चलती असल्याने त्याच्या बडेजावला भुलून अनेक उद्योगती, मोठे शासकीय अधिकारी यांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून एका अर्थाने हा मोठा सट्टाच लावला. रिंगरोडच्या बाधित सर्वांत जास्त जमिनी या भूमाफियानी खरेदी केल्या होत्या व या जमिनीचा मोबदला शेकडो करोडो रुपयांच्या घरात येणार असल्याने त्यातून आपल्याला परतावा मिळेल, या आशेवर ही गुंतवणूक शेतकर्‍यांनी, उद्योजकांनी, अधिकारीवर्गांनी केली होती. परंतु, मोबदला मिळण्यास होत असलेला विलंब, मिळालेला मोबदला व्याजापोटी गेल्याने व शिल्लक मोबदल्यात कोणाचीही देणी भागत नसल्याने हा भूमाफिया गडबडला आहे, त्याला लोकांनी दिलेले पैसे देणे अशक्य झाले आहे. अखेर गुंतवणूक केलेल्या अनेक तरुण शेतकर्‍यांनी या भूमाफियाचा फोटो समाज माध्यमावर व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवून फोटो खाली ’देव’ असा उल्लेख करून एका अर्थाने आमचे पेसे लवकर द्या, अशी विनवणी केली. या स्टेटसची खमंग चर्चा पूर्व हवेलीत जोरदार सुरू आहे.

हेही वाचा

Back to top button