हे चाललंय काय? पुण्यातील कचरा फेकला जातोय दौंड तालुक्यात | पुढारी

हे चाललंय काय? पुण्यातील कचरा फेकला जातोय दौंड तालुक्यात

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिका हद्दीतील कचर्‍याचा प्रवास दौंड तालुक्यातील कासुर्डी, भांडगाव परिसरात होत होता. त्याबाबत दै. ’पुढारी’ने आवाज उठवताच काही दिवसांची त्या कचर्‍यास विश्रांती भेटली. मात्र, आता या कचर्‍याला थेट दापोडी गावापर्यंत पाय फुटल्याचा प्रकार रविवारी (दि. 7) उघडकीस आला. कचर्‍याने भरलेले डंपर पुण्याहून जवळपास 70 किलोमीटरचे अंतर ओलांडून पुणे-सोलापूर महामार्गाने दौंड तालुक्यातील दापोडी भागात येत आहेत. त्यानंतर या डंपरमधील कचरा गावच्या हद्दीत राजरोसपणे उघड्यावर फेकून दिला जात आहे. यापूर्वी तालुक्यात भांडगाव, सहजपूर, तांबेवाडी परिसरातील डोंगर भागात मोठ्या प्रमाणात पुणे महानगरपालिका हद्दीतील कचरा आणून टाकण्यात येत होता.

त्यामुळे कचर्‍याचे मोठे ढीग तयार झाले होते. त्याची दुर्गंधीसुद्धा सुटली होती. दरम्यान, या प्रकाराचा पर्दाफाश दै. ’पुढारी’मधून करण्यात आला. त्यानंतर काही काळ हा सगळा कारभार ठप्प झाला आणि काही काळ कचरा येण्याचे थांबले. मात्र, रविवारी सुटीचा दिवस पाहून पुणे महानगरपालिकेचा कचरा घेऊन जाणारा डंपर थेट केडगाव चौफुल्यावरून 4 किलोमीटर आतमध्ये केडगाव-पारगाव रस्त्यावरील जुन्या टोलनाक्यापासून दापोडी गावच्या हद्दीत जाताना नागरिकांना दिसला. या डंपरमधून उग्र दुर्गंधी येत होती. या प्रकारामुळे पुण्यातील कचरा दापोडी गावात आणून टाकला जात आहे याची खात्री नागरिकांना झाली.

कडक कारवाई झालीच पाहिजे

याप्रकरणी दौंड तालुक्याच्या आरोग्य विभागाने तत्काळ लक्ष घालणे गरजेचे आहे. वारंवार पुणे हद्दीतील कचरा तालुक्यामध्ये आणण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे आणि हा कचरा येथे कोणामार्फत आणला जात आहे. याची सखोल चौकशी करण्यात यावी. नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरणार्‍या या कचरा वाहतूक प्रकरणातील संबंधितांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी दापोडीतील नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा

Back to top button