Pune : बालभारती-पौडफाटा रस्त्याची आज सीईसीकडून पाहणी | पुढारी

Pune : बालभारती-पौडफाटा रस्त्याची आज सीईसीकडून पाहणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या नियोजित बालभारती-पौडफाटा रस्त्याच्या मार्गाची प्रत्यक्षात पाहणी करून, त्यासंबंधीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थापन झालेली सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटी (सीईसी) ही एकसदस्यीय समिती आज शुक्रवार (दि.5) प्रत्यक्ष जागेची पाहणी करणार आहे. तसेच, महापालिकेसह मार्गाला विरोध करणार्‍या पर्यावरणवाद्यांची बाजू ऐकून घेणार आहे. ही समिती याबाबतचा अहवाल न्यायालयाला सादर करेल.

विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने बालभारती ते पौडफाटा या दरम्यान रस्ता तयार करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, या रस्त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होणार असल्याचा आक्षेप घेत पर्यावरणप्रेमींनी या रस्त्याला विरोध केला आहे. तसेच, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाअंतर्गत येणार्‍या सीईसी याचिका दाखल केली होती.

सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटीने या याचिकेची दखल घेऊन सीईसीचे सदस्य सुनील लिमये यांची एकसदस्यीय समिती नियुक्त केली आहे. या संबंधीची सर्व माहिती, नकाशे समितीसमोर सादर करावेत, असे सीईसीने महापालिकेला कळवले आहे. याबाबतचा अहवाल कमिटीकडून न्यायालयाला सादर केला जाणार आहे.

हेही वाचा

Back to top button