‘स्क्रीन टाइम’चे साइड इफेक्ट्स, शहरी मुलांमध्ये वाढताेय ‘मायोपिया’

‘स्क्रीन टाइम’चे साइड इफेक्ट्स, शहरी मुलांमध्ये वाढताेय ‘मायोपिया’

नवी दिल्ली : सध्या वाढलेला स्क्रीनटाईम हा अनेक बाबतीत चिंतेचा विषय बनत आहे. आता तज्ज्ञांनी म्हटले आहे की, विशेषतः शहरी मुलांमध्ये डोळ्यांचा मायोपिया आजार वाढत चालल्याचे दिसून येते. 5 ते 15 वर्षे वयोगटातील शहरी मुलांमध्ये मायोपियाचे प्रमाण 1999 मध्ये 4.4 टक्केवरून 2019 मध्ये 21.1 टक्केपर्यंत वाढलं आहे. दरवर्षी 0.8 टक्केच्या प्रमाणानुसार शहरी मुलांमध्ये मायोपियाचे प्रमाण वाढेल. 2030 मध्ये 31.89 टक्के, 2040 मध्ये 40 टक्के आणि 2050 मध्ये 48.1 टक्के. याचा अर्थ असा आहे की, भारतातील प्रत्येक दोन मुलांपैकी एक बालक येत्या 25 वर्षांत मायोपियाने ग्रस्त असेल.

वाढलेला 'स्क्रीन टाइम' मुलांच्‍या डाेळ्यांसाठी घातक

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बैठी जीवनशैली, दीर्घकाळ स्क्रीनचा वापर आणि कमी बाह्य क्रियाकलाप यामुळे मुलांमध्ये मायोपियाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होते आहे. या वाढत्या समस्येची मूळ कारणे बहुआयामी आहेत. स्क्रीनवरील अधिक वेळ मुलांच्या डोळे, रेटिना आणि मेंदूला उत्तेजित करतो. ज्यामुळे बुब्बुळाच्या जलद वाढीमुळे मायोपिक बदलांना गती मिळते. याव्यतिरिक्त घराबाहेर स्वच्छ सूर्यप्रकाशात फिरणे नसल्याने मुलांना डोळ्यांच्या निरोगी विकासासाठी आवश्यक असलेला नैसर्गिक प्रकाश मिळू शकत नाही.

रुग्णांचा वयोगटही आता गेल्या काही वर्षांमध्ये बदलताना दिसून येतोय. डोळ्यांच्या तपासणीसाठी लहान मुलं वारंवार येत असल्याचं दिसत आहे. त्यातील अधिकाधिक मुलांना मायोपिया असल्याचं दिसत आहे. 2017 मध्ये मुंबईतील शहरी झोपडपट्टी भागातील 3-15 वयोगटातील एक हजार मुलांचे सर्वेक्षण केल्यावर त्यापैकी 200 मुलांना मायोपिया असल्याचे आढळून आले. मुलांमध्ये मायोपियाची लक्षणे ओळखून वैद्यकीयदृष्ट्या झटपट हालचाल करणे महत्त्वाचे आहे.

लक्षणांमध्ये अस्पष्ट दृष्टी, दूरच्या वस्तू पाहण्यात अडचण, डोळ्यांवरील ताण, डोकेदुखी आणि थकवा विशेषतः दीर्घकाळ स्क्रीन वापरल्यानंतर यांचा समावेश होतो. ही स्थिती बरी होऊ शकत नसली तरी चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सच्या मदतीने फरक पडू शकतो. वयाच्या 19 वर्षांनंतर लेझर दृष्टी सुधारणा उपचारदेखील निवडला जाऊ शकतो. परंतु डोळ्यांची नियमित तपासणी करणे, स्क्रीनवरील वेळेचा समतोल राखण्यासाठी मुलांना घराबाहेर स्वच्छ सूर्यप्रकाशात क्रियाकलापांसाठी प्रोत्साहित करणे आणि मायोपियाची पुढील प्रगती मंदावण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने आय ड्रॉप्स किंवा मायोपिया कंट्रोल ग्लासेससारख्या वैद्यकीय उपायांचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news