छ. संभाजीनगर : पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाची सुरक्षा ‘राम भरोसे’; १८० पितळी नोजल्स चोरीला

पैठण येथील  संत ज्ञानेश्वर उद्यानातून १८०    पितळी नोजल्स चोरीला गेले आहेत.
पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानातून १८० पितळी नोजल्स चोरीला गेले आहेत.

[author title="चंद्रकांत अंबिलवादे" image="http://"][/author]

पैठण: पैठण येथील बंद पडलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानातील सुरक्षेवर लाखोंची उधळपट्टी सुरू असताना उद्यानातील पितळी नोजल्स चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. २ लाख २१ हजार ९४० रुपयांचे रंगीत कारंजाचे १८० पितळी नोजल्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. या प्रकारामुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चोरी प्रकरणी पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता यांनी पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाला पुरेसा निधी न मिळाल्यामुळे गेल्या काही वर्षापासून बंद अवस्थेत होते. परंतु, उद्यान पुनर्जीवन करून लवकरच पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. उद्यान परिसरात दुरुस्तीची कामे चालू केली आहेत. उद्यानातील रंगीत कारंजा सुरू करण्यासाठी संबंधित ठेकेदार यांनी १८० पातळी नोजल्स (प्रत्येकी किंमत १२३३) बसवली आहेत. दरम्यान, दि. १९ मार्च २०२४ ते १२ मे २०२४ या दरम्यान अज्ञात चोरट्याने ही नोजल्स चोरून नेली आहेत.

या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता तुषार शशांक विसपुते यांनी पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध शुक्रवारी (दि. १७) रात्री गुन्हा दाखल केला आहे. या चोरीचा तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे करीत आहेत.

उद्यानातील कामे कासवगतीने सुरू

उद्यानातील अंतर्गत विविध कामे मागील काही दिवसांपासून कासवगतीने सुरू आहेत. उद्यानातील अंतर्गत सुरक्षेचे काम छत्रपती संभाजीनगर येथील एका बड्या राजकीय नेत्याच्या खासगी सुरक्षा पुरविणाऱ्या संस्थेला दिले आहे. संपूर्ण परिसरात जवळपास १५ हून अधिक सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. उद्यान पुनर्जीवन नावाखाली राजकीय पुढाऱ्याच्या मर्जीतील ठेकेदारांना कामे दिली जात आहेत.

सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रक्रिया सुरू

दरम्यान, उद्यानात सीसीटीव्ही कॅमेरे आत्तापर्यंत बसविण्यात आलेली नाहीत. याबाबत  उद्यानाचे अभियंता दीपक डोंगरे यांनी सांगितले की सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रक्रिया सुरू असून लवकरच या कामाच्या निविदा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्यानातील यंत्रसामुग्रीला चोरट्यांचे ग्रहण

संत ज्ञानेश्वर उद्यान एका महिन्यात सुरू करण्यात येईल, असे वारंवार मागील काही दिवसांपासून पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्याकडून सांगितले जात आहे. उद्यान सुरू होण्यापूर्वीच उद्यानातील नवीन बसविण्यात आलेल्या यंत्रसामुग्रीला चोरट्यांचे ग्रहण लागले आहे. पुनर्जीवन करण्याच्या नावाखाली उद्यान अजून किती दिवस बंद राहणार ? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news