पुणे पोलिसांचे ‘ऑपरेशन हॉटस्पॉट’ : गुन्हेगारांच्या 18 वस्त्यांची कुंडली तयार | पुढारी

पुणे पोलिसांचे ‘ऑपरेशन हॉटस्पॉट’ : गुन्हेगारांच्या 18 वस्त्यांची कुंडली तयार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सराईत गुन्हेगार वास्तव्यास असलेली शहरातील अठरा ठिकाणे पोलिसांनी शोधून काढली आहेत. गुन्हे शाखेकडून ही कुंडली तयार करण्यात आली आहे. परिमंडळ तीन, चार, पाच आणि दोनच्या हद्दीत सर्वाधिक हॉटस्पॉट आढळून आले आहेत. या ठिकाणी एकाचवेळी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिस कोम्बिंग ऑपरेश राबवून सराईतांवर अंकुश ठेवणार असल्याचे अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

गुन्हेगारांचे वास्तव्य असलेल्या संपूर्ण परिसराचे मॅपिंग करून हे हॉटस्पॉट पोलिसांनी निश्चित केले आहेत. त्यासाठी मागील काही महिन्यांपासून काम सुरू होते. वाढत्या गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांकडून विविध उपायोजना करण्यात येत आहेत. त्याचाच हा एक भाग आहे. यामध्ये बेकायदा शस्त्र बाळगणे, अल्पवयीन गुन्हेगार, अवैध धंदेवाले, वाहनचोरी, अमली पदार्थ तस्करी, तडीपार, तोडफोड करणारी टोळकी, टायर, पेट्रोलचोरी, जबरी चोरी करणार्‍या गुन्हेगारांबरोबर भुरट्या चोरट्यांना आयडेंटीफाय करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांचे या परिसरात आता विशेष लक्ष असणार आहे. प्रामुख्याने गुन्हे शाखेने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गुन्हे शाखेचे सर्व युनिट एकाचवेळी या परिसरात स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन पूर्ण ताकदीने कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईतांची झाडाझडती घेणार आहेत.

त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहन तोडफोडीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. त्यांना लगाम घालण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. तोडफोड होणारी ठिकाणे शोधण्याबरोबरच शहरात तोडफोड करणारी टोळकी पोलिसांनी शोधून काढली असून त्यांची वास्तव्याची ठिकाणे रडारवर घेतली आहेत. त्यामुळे भविष्यात अशा घटनांना प्रतिबंध करण्यास मदत होऊ शकते. दोन टप्प्यात हे ऑपरेशन राबविण्यात येणार असून शोधण्यात आलेली ही अठरा मोठी ठिकाणे पहिल्या टप्प्यातील आहेत. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात छोटी ठिकाणे शोधून, त्याबाबत उपायोजना करण्यात येणार असल्याचे बलकवडे यांनी सांगितले.

ही ठिकाणे शोधून काढत असताना पोलिसांना जबरी चोर्‍यांमध्ये तरुण आणि भुरटे चोरटे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामधील बहुतांश आरोपी हे स्थानिक आहेत. दरोडा, दरोड्याची तयारी अशा गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा देखील समावेश असल्याचे पुढे आले आहे. त्याच-त्याच परिसरात ही टोळकी गुन्हे करत आहेत. पोलिस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, सुनील तांबे या अधिकार्‍यांचे या हॉटस्पॉट ऑपरेशनवर विशेष लक्ष असणार आहे.

आकडे काय म्हणतात?

 परिमंडळ हॉटस्पॉट

  •  परिमंडळ एक : 02
  • परिमंडळ दोन : 03
  •  परिमंडळ तीन : 04
  •  परिमंडळ चार : 05
  •  परिमंडळ पाच : 04

अल्पवयीन गुन्हेगारांवर लक्ष

पोलिसांसमोरील मोठे आव्हान असून, तिचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी दुरगामी पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. हॉटस्पॉट आयडेंटीफाय करताना पोलिसांनी याबाबत लक्ष केंद्रित केले आहे. तोडफोड, जबरी चोरी, वाहनचोरी अशा गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा मोठा सहभाग असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी त्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते.

हेही वाचा

Back to top button