समुद्रकिनारी फिरताना सापडला मॅमथचा दात | पुढारी

समुद्रकिनारी फिरताना सापडला मॅमथचा दात

लंडन : इंग्लंडमधील एका महिलेला पतीसमवेत समुद्रकिनारी फिरत असताना अपघातानेच मॅमथचा दात सापडला. मॅमथ हे लाखो वर्षांपूर्वीचे केसाळ हत्ती होते. हा दात म्हणजे एखादा खजिना सापडल्यासारखेच आहे; कारण मॅमथच्या जीवाश्माला संशोधनासाठी अतिशय महत्त्व असते.

56 वर्षांच्या ख्रिस बाएन यांनी सांगितले की, जमिनीच्या बाहेर डोकावत असलेल्या एका विचित्र वस्तूकडे माझे सहज लक्ष गेले. तिच्या आकृतीवरून मी अनुमान लावला की, हा एखादा दात असू शकतो. मी हातानेच आजूबाजूची माती, वाळू हटवण्यास सुरुवात केली. तो जमिनीत इतका खोलवर रुतलेला होता की, मला मदतीची गरज भासली. हा एखाद्या विशालकाय प्राण्याचा दात असावा, असे स्पष्टच दिसत होते.

उत्तर एसेक्सचा समुद्र तट अशा जीवाश्मांसाठी प्रसिद्धच आहे. हा दात सर्वात मोठ्या मॅमथ प्रजातींपैकी एका मॅमथचा असावा. त्याला ‘स्टेपी मॅमथ’ असे म्हटले जाते. त्यांना वुली मॅमथ म्हणजेच केसाळ हत्तींचे पूर्वजही म्हटले जाते. अशाच एका हत्तीचा दात या ठिकाणी सापडला. या दाताचे वजन सुमारे 1.9 किलोग्रॅम आहे. त्याची खोली सात इंच आहे. अर्थात, हा दात हस्तिदंतासारखा किंवा बाहेरचा सुळा नसून, तो मॅमथच्या तोंडाच्या आतील दातांचा समूह आहे.

Back to top button