धक्कादायक ! दहशतवाद्यांची कोंढव्यातच भरली बॉम्ब बनविण्याची शाळा | पुढारी

धक्कादायक ! दहशतवाद्यांची कोंढव्यातच भरली बॉम्ब बनविण्याची शाळा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरीया (इसिस) या संघटनेच्या दहशतवाद्यांनी कोंढव्यामध्ये बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेण्याबरोबर त्यांनी नियंत्रित पद्धतीत बॉम्ब ब्लास्ट घडवून आणले होते. त्यासाठी त्यांनी पश्चिम घाटात रेकी केली होती. त्याबरोबरच महाराष्ट्रातील तसेच गुजरातमधील मेट्रोसिटीमध्ये या दहशतवाद्यांचा बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट असल्याचा धक्कादायक प्रकार तिसरे पुरवणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर समोर आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाच्या तिसर्‍या आरोपपत्रात एनआयएने चार दहशतवाद्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये मोहम्मद शहानवाझ आलम, रिजवान अली,

अब्दुलाह शेख आणि तलाह लियाकत खान अशा चौघांवर नव्याने आरोपपत्र दाखल केले आहे. तर यापूर्वी मोहम्मद इम—ान मोहम्मद युसुफ खान ऊर्फ मटका ऊर्फ अमीर अब्दुल हमिद खान (रा. रतलाम मध्यप्रदेश), मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी ऊर्फ अदिल ऊर्फ अदिल सलीम खान (रा. रतलाम, मध्यप्रदेश), कादीर दस्तगिर पठाण ऊर्फ अब्दुल कादीर (रा. कोंढवा, पुणे), समीब नासीरउद्दीन काझी (रा. कोंढवा पुणे), जुल्फीकार अली बडोदवाला ऊर्फ लालाभाई ऊर्फ लाला ऊर्फ सईफ, शमिल साकिब नाचन आणि आकिफ अतिक नाचन (रा. तिघेही रा. पडघा, ठाणे) आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. सर्वांवर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा (युएपीए), एक्स्लोसीव्ह सबस्टन्स अ‍ॅक्ट, आर्म अ‍ॅक्ट तसेच विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

दाखल केलेल्या तिसर्‍या पुरवणी आरोपपत्रनुसार, यातील मोहम्मद आलम हा कोथरूडमधून दुचाकी चोरताना कोथरूड पोलिसांनी त्याला पोलिसांनी पकडले होते. पकडण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी तो एक होता. मात्र, त्याला कोंढवा येथे तपासासाठी नेल्यानंतर तो तेथून पळून गेला होता. त्यानंतर त्याला 2 नोव्हेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी अटक करून एनआयएकडे पुढील तपासासाठी वर्ग केले होते. आलमला जेव्हा ताब्यात घेण्यात आले तेव्हा त्याच्या सापडलेल्या कपड्यावरील व त्याचे डीएनए सॅम्पल जुळले. पकडण्यात आलेले सर्व दहशतवादी इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचा दहशतवादी कृत्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी पुण्यात आणि महाराष्ट्रात मोठे दहशतवादी कृत्य करण्याची योजना आखल्याचेही एनआयएने केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे.

पकडण्यात आलेले दहशतवादी विदेशात बसलेल्या हँडलरच्या सिक्रेट अ‍ॅपद्वारे संपर्कात असल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यांनी दरोडे, चोर्‍या करून दहशतवादी कृत्यासाठी निधी उभा केल्याचे व त्यांनी लँडलरकडून देखील पैसे घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. हे दहशतवाद्यांनी आयईडी (इम्प्रूव्हाईस एक्स्पोझीव्ह डिव्हाईस) म्हणजेच बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण कोंढव्यात घेतले होते. त्या आधारे त्यांनी जंगलात रेकी करून नियंत्रित स्फोटाच्या चाचण्या देखील घडवून आणल्याचे इसिसने केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांचा महाराष्ट्रातील तसेच गुजरातमधील मेट्रोसिटीमध्ये स्फोट घडवून आणण्याचा देखील मानस होता. त्यांनी दहशतवादी कारवाईसाठी शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देखील घेतल्याचे एनआएच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

एनआयएने बॉम्ब बनविण्याच्या ट्रेनिंगच्या नोट्सही केल्या जप्त

दहशतवाद्यांनी बॉम्ब बनविण्याचे (आईडी) प्रशिक्षण जेव्हा घेतले. त्यावेळी त्यांनी त्या संबंधीच्या लेखी नोट्स काढल्या होत्या. त्या देखील एनआयएने तपासात जप्त केल्या आहेत. त्याबरोबर त्यांच्याकडून ड्रोन, चाकू, कपडे जप्त करण्यात आले. त्यांनी त्यांचा परदेशातील इसिसचा दहशतवादी हँडलर खलिफा याच्याकडून इसिसशी संबंधित शपथ घेतली आहे.

प्रकरणाचा आजवर झालेला तपास….

  •  पुण्यातील कोथरूडमधून तिघांना झाली होती अटक
  •  राजस्थानमधील चित्तोडगडमधील स्फोटके बाळगल्याचा गुन्ह्यात सहभाग
  •  बंदी घातलेल्या अलसुफा संघटनेशी संबंध
  •  मोहम्मद आलम झाला होता फरार
  •  दहशतवाद्यांकडे आईडी, पिस्तुल आणि दारूगोळा देखील सापडला
  •  फरार दहशतवाद्यांना आश्रय देण्याबरोबर त्यांना इम्प्रुव्हाईज एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आईडी) तयार करण्यासाठी पूर्व तयारी
  •  आरोपींच्या तपासात त्यांनी दहशवाद्यांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन
  • बॉम्बस्फोट केल्यानंतर अटक टाळण्याची देखील योजना त्यांनी आखली
  • अटकेपासून वाचण्यासाठी त्यांनी दुर्गम जंगलात लपण्याचा देखील प्लॅन
  •  जंगलात लपण्यासाठी त्यांनी ड्रोनद्वारे ती जंगलातील ठिकाणे देखील शोधली
  •  दहशतवादी कृत्यासाठी त्यांना भारतातून तसेच परदेशातून वित्तपुरवठा
  • भारताची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्वाला धोका पोहोचविण्याचा उद्देश
  •  भारतीय भुमीवर दहशतवादी कारवाया करण्याचा त्यांचा हेतू
  •  महाराष्ट्र, गोवा, तेलंगणासह इतर राज्यामध्ये इसिसचा प्रसार करण्यासाठी रेकी
  • कोथरूडमधून पकडण्यापूर्वी साताऱ्यातील व्यापाऱ्यालाही लुटले, नवीन गुन्हा दाखल

हेही वाचा

Back to top button