कोल्हापूर : थेट पाईपलाईनच्या पाण्यावर वादाचे फवारे

कोल्हापूर : थेट पाईपलाईनच्या पाण्यावर वादाचे फवारे
Published on
Updated on

कोल्हापूर : शहरवासीयांचे स्वप्न असलेल्या थेट पाईपलाईनचे पाणी पुईखडी येथे येऊन पडले. माजी पालकमंत्र्यांनी त्याचा आनंदोत्सव साजरा करत उद्घाटन केले. याच योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा देखील झाला. सत्ताधारी आणि विरोधकांनी थेट पाईपलाईन योजनेचा लोकार्पण सोहळा करूनही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेचे पाणी पुन्हा पेटले आहे. यातून वादाचे फवारे उडू लागले असून पाटील-महाडिक संघर्ष या निमित्ताने उफाळून आला आहे.

शहराला होणार्‍या दूषित पाणी पुरवठ्यामुळे शहरात साथी पसरू लागल्याने थेट पाईपलाईनचा पर्याय पुढे आला. यासाठी गेल्या चार दशकापासून संघर्ष सुरू होता. मध्येच शिंगणापूर योजना आली. त्यामुळे थेट पाईपलाईन सत्यात उतरते की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी या योजनेचा सातत्याने पाठपुरावा करत थेट पाईपलाईनचे स्वप्न सत्यात उतरविले आणि सन 2014 मध्ये या योजनेच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली. याच दरम्यान, महाडिक व पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला गेला.
त्यानंतर दोघेही एकमेकांना पाण्यात पाहू लागले. थेट पाईपलाईन योजनेचे काम चांगल्या दर्जाचे व वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. परंतु काही ना काही कारणामुळे ते लांबत गेले. काम पूर्णत्वास आल्याची माहिती प्रशासनाने दिल्यानंतर आ. सतेज पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी दिवाळीचे अभ्यंगस्नान थेट पाईपलाईनने होणार अशी घोषणा केली. परंतु हे काम पूर्ण होऊ न शकल्यामुळे महाडिक गटाने त्याच्या विरोधात आंदोलन सुरू केले. आतापर्यंत महाडिक गटाचे कार्यकर्तेच थेट पाईपलाईनसंदर्भात आरोप करण्यात पुढे होते. खा. धनंजय महाडिक यांनी देखील या कामाचे श्रेय घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. कधी त्यांनी त्यावर भाष्यदेखील केले नाही.

परंतु आता काम पूर्ण झाल्यानंतर लोकसभेच्या तोंडावर त्यांनी थेट पाईपलाईनच्या कामाची पूर्तता आणि त्याच्या दर्जावरून पाटील यांच्यावर महाडिक यांनी निशाणा साधला आहे. प्रथमच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत पुईखडी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पास भेट देऊन पाहणी करत त्यातील त्रुटींवर बोट ठेवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पुन्हा एकदा महाडिक व पाटील गटात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्यातील संघर्षाला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धार आली आहे.

लोकसभा निवडणुकीत पाटील-महाडिक सामना रंगणार

लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व शिवसेना शिंदे गट यांच्यात लढत असली तरी महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा आ. सतेज पाटील तर महायुतीच्या आघाडीच्या प्रचाराची धुरा भाजपचे खा. धनंजय महाडिक यांच्यावरच असणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत पाटील-महाडिक यांचा सामना रंगणार हे आताच सुरू झालेल्या कलगीतुर्‍यावरून स्पष्ट होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news