Crime News : बकरी देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारी टोळी गजाआड | पुढारी

Crime News : बकरी देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारी टोळी गजाआड

पुणे : पुढारी वृत्तसेवा : व्यवसायासाठी स्वस्तात बकरी देण्याच्या बहाण्याने लूटमार करणार्‍या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी गजाआड केले. या टोळीने हैदराबादमधील एका व्यावसायिकाला स्वस्तात बकरी देण्याच्या बहाण्याने मारहाण करून पाच लाख 73 हजारांचा ऐवज लुटला होता. पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन परिसरात ही घटना घडली होती. अमोल काढण भोसले (वय 32, रा. कोळगाव पांढरेवाडी, ता.श्रीगोंदा, जि. अहमदनगर), शिवा पैदास ऊर्फ सुरेश चव्हाण (वय 19, रा. वेठेकरवाडी, ता. श्रीगोंदा, जि.अहमदनगर), श्याम पैदास (वय 23, रा. वेठेकरवाडी, ता. श्रीगोंदा, जि.अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अब्दुला लालबादशाह शेख (वय 30 रा. हैदराबाद, जेडीमेटला एरिया, जि. रंगारेड्डी, आंध्रप्रदेश) यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

हैदराबादमधील व्यावसायिक अब्दुला शेख यांना स्वस्तात बकरी घेऊन देतो, असे आमिष दाखवून त्यांना पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन परिसरात बोलावून घेतले होते. बकरी दाखविण्याच्या बहाण्याने आरोपींनी त्यांना एका शेतात नेले. त्यांना दांडक्याने मारहाण करून पाच लाखांची रोकड, मोबाईल, सोनसाखळी असा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले होते. शेख यांनी याबाबत तक्रार दिल्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला. सराईत चोरटा भोसले आणि साथीदारांनी लूटमार केल्याची माहिती तपासात मिळाली.

भोसले लोणावळा परिसरात साथीदारांसोबत आल्याची माहिती तपासात मिळाल्यानंतर सापळा लावून पोलिसांनी तिघांना पकडले. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस
निरीक्षक अविनाश शिळीमकर, शंकर पाटील, सहायक निरीक्षक राहुल गावडे, उपनिरीक्षक अमित सिदपाटील, पाडुळे, सचिन घाडगे, दीपक साबळे, अजित भुजबळ, विक्रम तापकीर, योगेश नागरगोजे, राजु मोमीन, अतुल डेरे, बाळासाहेब खडके यांनी ही कारवाई केली. टोळीचा म्होरक्या अमोल काढण भोसलेविरुद्ध पुणे ग्रामीण, नगर, जिल्ह्यात दरोडा, घरफोडीचे नऊ गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा

Back to top button