पुण्यातील शास्त्रज्ञांचा जगात डंका ! लावला दहा आकाशगंगांचा शोध | पुढारी

पुण्यातील शास्त्रज्ञांचा जगात डंका ! लावला दहा आकाशगंगांचा शोध

पुणे : पुढारी वृत्तसेवा : तब्बल नऊ अब्ज प्रकाशवर्षे अंतरावर असणार्‍या दहा नव्या आकाशगंगा शोधून तेथून निघणारे अतिनील फोटॉन किरणांचे निरीक्षण पुण्यातील आयुकाच्या शास्त्रज्ञांनी जगात प्रथमच यशस्वी केले आहे. डॉ. सूरज धीवर आणि डॉ. कनक शहा या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. भारताने 2016 मध्ये आकाशगंगांचा शोध घेण्यासाठी अ‍ॅस्ट्रोसॅट नावाचा उपग्रह अवकाशात पाठवला होता. त्यावर आयुकातील शास्त्रज्ञांची टीम काम करीत आहे. डॉ. सूरज धीवर आणि डॉ. कनक शहा यांनी स्थानिक आकाशगंगेपासून आठ ते नऊ अब्ज प्रकाशवर्षे लांब असणार्‍या नव्या आकाशगंगा शोधून काढल्या. त्यातून निघणार्‍या अतिनील किरणे टिपण्यात त्यांना यश आले आहे. अ‍ॅस्ट्रोसॅट उपग्रहात यूव्हीआयटी ही अस्सल भारतीय दुर्बीण आहे. त्याद्वारे या शास्त्रज्ञांनी इलेक्ट्रॉन आणि फोटॉनचाही अभ्यास केला.

ब्रह्मांडाच्या निर्मितीसारख्याच या आकाशगंगा ब्रह्मांडाची निर्मिती एका महास्फोटानंतर झाली असे मानले जाते. पहिल्या एक अब्ज वर्षांच्या आत आपले विश्व री-आयोनायझेशन या प्रक्रियेतून तयार झाले. या प्रक्रियेत हायड्रोजनचे अणू हे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनमध्ये विलग होतात. जेव्हा त्यावर उच्च ऊर्जेच्या अतिनील किरणोत्सर्ग होतो. या प्रकाशाला लायमन कॉन्टिन्युम म्हणून ओळखले जाते. या प्रकाशाची वारंवारता 600 आर्मस्ट्राँग इतकी आहे. त्यांना टिपणे अवघड काम असते कारण त्या ब्रह्मांडाच्या पसार्‍यात लुप्त होऊन जातात त्यामुळे हे संशोधन महत्त्वाचे आहे.

अतिनील किरणांत टिपलेली पहिलीच प्रतिमा

या आकाशगंगा पृथ्वीपासून सुमारे 8 ते 9 अब्ज प्रकाशवर्षे दूर आहेत. त्यांचा तारा निर्मितीचा दर तीव्र आहे. त्यापैकी काही आपल्या आकाशगंगेपेक्षा 100 पट जास्त दराने प्रचंड तरुण तारे तयार करतात. सर्वात लहान अल्ट्राव्हायोलेट प्रकाशामध्ये आतापर्यंत तयार केली गेली ही आकाशगंगेची पहिलीच प्रतिमा आहे. ती आयुकाच्या शास्त्रज्ञांनी टिपली आहे.

स्थानिक आकाशगंगांच्या समूहापासून खूप दूर

आपल्या पृथ्वीपासून सुमारे 65 हजार प्रकाशवर्षे अंतरावर 26 स्थानिक आकाशगंगा आहेत. त्यापासून या नव्या दहा आकाशगंगा खूप दूर आहेत. पृथ्वीपासून त्यांचे अंतर 8 ते 9 अब्ज प्रकाशवर्षे लांब आहे.

हेही वाचा

Back to top button