Crime news : प्रवाशांना मारहाण करून लुटणारे गजाआड | पुढारी

Crime news : प्रवाशांना मारहाण करून लुटणारे गजाआड

दौंड : पुढारी वृत्तसेवा :  आम्ही पोलिस कर्मचारी आहोत, तुमची झडती घ्यायची आहे, असे सांगून परप्रांतीयांना अडविण्यात आले. मात्र, आमची झडती इथे नको, पोलिस ठाण्यात घ्या, असे म्हटल्यावर त्यांना मारहाण करून मोबाईल व रोकड जबरीने घेऊन पोलिस ठाण्यात तक्रार करायला गेला तर ठार करू, असे धमकावणार्‍या दोघांच्या दौंड पोलिसांनी मुसक्या आवळल्या. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता दोन परप्रांतीय युवक दौंड रेल्वेस्थानकातून बसस्थानकाकडे जात होते. या वेळी दोघे मोटारसायकलने त्यांच्याजवळ आले. त्यांना अडवून पोलिस असल्याचे सांगून झडती घेऊन त्यांच्याजवळचा एक मोबाईल व रोकड असा 18 हजार 200 रुपयांचा ऐवज त्यांनी बळजबरीने काढून घेतला. त्यानंतर पोलिसांना कळविल्यास जिवे मारू, अशी धमकी देत मारहाण केली. याबाबत मुनहेन्द्रसिंग कोमलसिंग नरवारिया (रा. शिरूर) याने दौंड पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रार दाखल होताच दौंडचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्मचार्‍यांना कारवाईच्या तत्काळ सूचना दिल्या. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून मंगळवारी (दि. 6) दौंड शहरातून पानसरेवस्ती व वडार गल्ली येथून दोघांना दौंड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची नावे अक्षय अशोक देवकर (रा. वडारगल्ली, दौंड) व युवराज पांडुरंग बनकर (रा. पानसरेवस्ती, दौंड) अशी आहेत. त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यात जबरदस्तीने चोरी केलेले साहित्य त्यांच्याकडे असल्याचे सांगितले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक संजय जाधव, दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंडचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस उपनिरीक्षक महेश आबनावे, गुन्हे शोध पथकाचे पोलिस हवालदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, पोलिस नाईक विशाल जावळे, आदेश राऊत, पोलिस जवान अमोल देवकाते आदींनी केली.

Back to top button