किल्ले रायगडाच्या वाड्याने उघडले इतिहासाचे दार | पुढारी

किल्ले रायगडाच्या वाड्याने उघडले इतिहासाचे दार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर सरदारांच्या वाड्यांनाही सांडपाण्याची स्वतंत्र व्यवस्था होती आणि या वाड्यांना गुप्त दरवाजेदेखील होते. आक्रमण परतवणे कठीण झाले तर प्रत्येकाला निसटता यावे, अशीच ही शिवकालीन व्यवस्था होती. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या (एएसआय) सर्वेक्षण पथकाने हाती घेतलेल्या रायगड किल्ल्यावरील वाड्याच्या शास्त्रोक्त उत्खननातून हे तपशील हाती आले आहेत.

रायगड किल्ल्यावरील वाड्याचे हे पहिले वैज्ञानिक उत्खनन आहे. या उत्खननाद्वारे त्या काळातील प्रगत बांधकाम तंत्राची प्रचिती येते. अंघोळीची आणि धुण्याची जागा, एक चांगली रचना असलेली ड्रेनेज सिस्टीम आणि युद्धादरम्यान सुटकेचा मार्ग म्हणून प्रत्येक वाड्याला एका गुप्त भुयाराचा मार्ग उपलब्ध असल्याच्या खुणा या उत्खननात दिसून आल्याचे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) मुंबई मंडळाच्या अधीक्षक, पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. शुभा मजुमदार यांनी म्हटले आहे.

वाड्याच्या या उत्खननात सुमारे 400 वर्षांपूर्वीच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दुर्मीळ कलाकृतीही सापडल्या आहेत. त्यात मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा साक्षीदार असलेले वाडे बव्हंशी अखंड स्थितीत दिसतात. काही शस्त्रे, खराब झालेल्या तलवारीचा भाग आणि भाला), तांब्याची नाणी, घोड्याच्या नाला, दिवे आढळले आहेत. रायगड किल्ल्यावरील वाड्यांच्या या उत्खननात वाड्यांमध्ये सापडलेली मुबलक शस्त्रास्त्रे पाहता मराठा साम्राज्यातील युद्धांमध्ये थेट सहभाग असल्याचे दिसून येतो, असे मजुमदार म्हणाल्या. या उत्खननात वाड्याच्या मध्यभागी खोल्या असलेल्या मोठ्या संरचनेचा पाया आणि लाकडी खांबांचा पाया असलेला एक दगडी ढाचा (प्लॅटफॉर्म) आढळून आला. या शोधामुळे शिवकालीन वाड्याच्या अधिरचनेवर अधिक प्रकाश पडेल.

वाड्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने उत्खनन केल्यानंतर आणि त्यांच्या संरचनेचा अभ्यास केल्यावर लक्षात आले की, वाड्यांचे बांधकाम अत्यंत नियोजित होते. त्यात सावधगिरीने केलेली रचना आढळते. कदाचित वेळ आणि हवामानाच्या आव्हानांविरुद्ध किल्ला भक्कम राहण्यासाठी ही रचना सहाय्यभूत ठरली. किल्ल्याच्या टिकाऊपणाचे श्रेय त्याच्या परिपूर्ण बांधकामाला जाते, असे एएसआय मुंबई सर्कलचे पुरातत्त्व शास्त्रज्ञ आणि उत्खनन तज्ज्ञ मलय कुमार सैन यांनी म्हटले आहे.

रायगड किल्ल्यांच्या विविध वास्तूंमध्ये पारंपरिक साहित्य वापरून संवर्धनाची कामे एकाच वेळी सुरू आहेत. जून 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ठिकाण म्हणून रायगड किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. 1680 मध्ये शिवाजी महाराजांच्या निर्वाणापर्यंत मराठा साम्राज्याची राजधानी रायगडचा उल्लेख होतो, असे एएसआय संवर्धन सहाय्यक राजेश दिवेकर यांनी सांगितले.

Back to top button