वळतीच्या शिळ्या बाजारात लाखोंची उलाढाल | पुढारी

वळतीच्या शिळ्या बाजारात लाखोंची उलाढाल

पारगाव : पुढारी वृत्तसेवा :  वळती (ता. आंबेगाव) येथील शिळ्या बाजारात यंदा लाखोंची उलाढाल झाली. वळती गावात आठवडे बाजार भरत नाही. त्यामुळे वर्षातून एकदाच भरणार्‍या या शिळ्या बाजारात महिला, मुले, ज्येष्ठांनी मोठी गर्दी केल्याने बाजारात लाखोंची उलाढाल झाली. थापलिंग देवस्थान हे पूर्वी वळती गावच्या हद्दीत येत होते. त्यानंतर नागापूरला स्वतंत्र ग्रामपंचायत झाली व देवस्थान नागापूर गावच्या हद्दीत गेले. थापलिंग देवस्थान हे वळती गावापासून अडीच-तीन किलोमीटर अंतरावर आहे. पूर्वीच्या काळी वाहनव्यवस्था नसल्याने वळती गाव, गांजवेवाडी, काटवानवस्ती परिसरातून महिलांना थापलिंग गडावर पायी जाणे कठीण होते. ही गैरसोय दूर व्हावी, यासाठी थापलिंग गडावरचीच दुकाने, हॉटेल तिसर्‍या दिवशी वळती गावात येऊ लागली. तेव्हापासून तीच परंपरा आजही टिकून आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून भरतोय बाजार
पौष पौर्णिमेला जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली श्री क्षेत्र थापलिंग यात्रा दोन दिवस साजरी केली जाते. त्यानंतर तिसर्‍याच दिवशी वळती गावात हा बाजार भरतो. थापलिंग गडावरची दुकाने तिसर्‍या दिवशी वळती गावात थाटली जातात; म्हणून या बाजाराला शिळा बाजार म्हणतात. स्वातंत्र्यापूर्वी सुरू झालेला हा शिळा बाजार मोठ्या उत्साहात भरतो.

महिलांची खरेदीसाठी होते गर्दी
या शिळ्या बाजारात महिला खरेदीसाठी मोठी गर्दी करीत असतात. बांगड्या, खेळणी दुकाने, रसवंतिगृहे, जिलबी, भजी, शेव-रेवडीचे हॉटेल, घरगुती व शेती उपयोगी साहित्यांची दुकाने या बाजारात थाटली जातात. या बाजारात संगमनेर, बीड, नगर, शिरूर या भागांतील व्यावसायिक, दुकानदार दाखल होतात. गेल्या वर्षापासून हा शिळा बाजार गावाशेजारील महादेव मंदिराच्या मैदानात भरत आहे. यंदा प्रथमच लहान चिमुकल्यांसाठी मिकी माऊस, छोटे पाळणे दाखल झाल्याने लहानग्यांसाठी यात्रेचा आनंद द्विगुणित केला.

Back to top button