लष्कराला लाभले आता एमएसएमईचे सुरक्षा कवच | पुढारी

लष्कराला लाभले आता एमएसएमईचे सुरक्षा कवच

पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशाच्या संरक्षण दलाला सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योगांनी तयार केलेल्या सामग्रीचे कवच लाभले आहे. संरक्षण दलासाठी काम करणार्‍या लघु उद्योगांची संख्या 641 वर गेली आहे. तर, या क्षेत्राची उलाढाल एक लाख कोटी रुपयांवर पोहोचली असून, निर्यातही 16 हजार कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) संरक्षण समितीने संरक्षण दलासाठी विविध उत्पादने तयार करणार्‍या उद्योग समूहांची नावे असलेली पुस्तिका प्रसिद्ध केली. संरक्षण दल आणि देशातील उद्योग समूहांना जोडणारा सांधा एमसीसीआयएने जोडला आहे.

सदर्न कमांड येथे आयोजित कार्यक्रमात लेफ्टनंट जनरल एके सिंग यांच्या हस्ते पुस्तिकेचे उद्घाटन झाले. मेजर जनरल अभिजित बापट, आरटीएनचे प्रमुख जयंत राजगुरू, एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबने, एमसीसीआयएच्या डिफेन्स कोअर कमिटीचे सदस्य हर्ष गुणे आणि डिफेन्स कमिटीचे संचालक प्रशांत जोगळेकर या वेळी उपस्थित होते. एमएसएमईच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तिकेत 641 उत्पादकांची नावे आहेत. यापूर्वीची पुस्तिका 2021 साली प्रकाशित झाली होती. त्यानंतर 5.5 उत्पादकांची त्यात भर पडली आहे. यावरून अवघ्या दोन वर्षांतच उत्पादकांची संख्या किती प्रमाणात वाढली, याचा अंदाज येतो. या उत्पादकांपैकी 50 ते 100 कोटी रुपयांदरम्यान उलाढाल असलेल्या उत्पादकांची 21 आहे. तर, एक ते 50 कोटी रुपयांदरम्यान उलाढाल असणार्‍यांची संख्या 408 आहे.

तर, एक कोटी रुपयांखाली उलाढाल असलेल्यांची संख्या 176 आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतीच एमएसएमईने संरक्षण दलाला पुरविलेल्या साहित्याची माहिती दिली. त्यानुसार या उद्योगाची उलाढाल एक लाख कोटी रुपयांवर गेली आहे. संरक्षण सामग्रीची 2016-17 साली उलाढाल 1 हजार 521 कोटी रुपये होती. त्यात 2022-23मध्ये 15,920 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. ही वाढ तब्बल दहापट आहे.

हेही वाचा

Back to top button