वॉशिंग्टन : अमेरिकेतील ख्यातनाम दिवंगत गायक एल्विस प्रिस्ले आता एका कार्यक्रमासाठी 'एआय'च्या सहाय्याने पुन्हा जिवंत होणार आहे. जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये होणार्या या कॉन्सर्टसाठी त्याला व्हर्च्युअली जिवंत केले जाईल. यामध्ये 'एआय'चा वापर तसेच त्याच्या होलोग्राफिक प्रोजेक्शनचा वापर केला जाईल. त्याची निर्मिती एल्विसच्या हजारो वैयक्तिक फोटो आणि घरगुती व्हिडीओंच्या सहाय्याने केली आहे.
हा शो यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात लंडनमध्ये सुरू होईल. त्यानंतर तो लास वेगास, बर्लिन आणि टोकियोमध्येही सादर केला जाईल. 'अब्बा व्होएज' या व्हर्च्युअल कॉन्सर्टच्या यशानंतर आता एल्विस प्रिस्लेच्या शोची ही संकल्पना पुढे आली आहे. स्विडीश पॉप बँडचा नवा अवतार या 'अब्बा व्होएज'मधून झाला होता. आता एल्विसचाही असाच कॉन्सर्ट वेगवेगळ्या शहरांमध्ये होईल. त्याचे नाव 'एल्विस इव्होल्युशन' असे आहे. ब्रिटनमधील 'लेअर्ड रिअलिटी'कडे त्याचे जागतिक हक्क आहेत.
या कंपनीने यापूर्वी 'द गनपावडर प्लॉट' आणि 'द वॉर ऑफ द वर्ल्डस' हे कार्यक्रम सादर केले होते. हा नवा प्रिस्ले शो थक्क करणारा असेल असे कंपनीने म्हटले आहे. खर्याखुर्या एल्विससारखा दिसणाराच एल्विस प्रथमच ब्रिटिश स्टेजवर कार्यक्रम सादर करील. हा कार्यक्रम म्हणजे, 'नेक्स्ट जनरेशन ट्रिब्युट टू द म्युझिकल लीजंड' (नव्या पिढीची संगीतामधील दंतकथा बनून राहिलेल्या एल्विसला मानवंदना) असेल असे कंपनीने म्हटले आहे.