सिंह : वार्षिक राशिभविष्य २०२४ : प्रगती आणि भरभराट होईल | पुढारी

सिंह : वार्षिक राशिभविष्य २०२४ : प्रगती आणि भरभराट होईल

होराभूषण रघुवीर खटावकर

सिंह राशीचा स्वामी रवी, पुरुष रास, अग्नी तत्त्व, स्थिर स्वभाव, बोधचिन्ह-सिंह राशीत मघा, पूर्वा, उत्तरा (१ चरण) ही नक्षत्रे आहेत.
वर्षभर नेपच्यून आणि राहू तुमच्या राशीच्या अष्टमस्थानी आहेत. प्लुटो षष्ठस्थानी आणि शनी ७ वा आहे.

नेपच्यून – राहू गूढ विद्येची आवड निर्माण करतील, तसेच मूतखडा, मूळव्याधीसारखे आजारही काहीना अनुभवावे लागतील.
लवकर निदान होणार नाही. (Leo Horoscope 2024)

षष्ठस्थानातील प्लुटो मातुल घराण्यातील व्यक्तींना त्रास दर्शवितो. कर्ज, रोग, शत्रू हे निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या. सप्तमस्थानातील शनी कुंभ या मूलत्रिकोण राशीत असल्यामुळे जोडीदार, परदेशाशी संबंधित व्यवहारांत न्यायी वृत्ती राहील व सौख्यही मिळेल; पण हाच शनी षष्ठेशही असल्यामुळे स्वतःचे व आईचे आरोग्य अन्य पापग्रहांशी संबंध सिंह-वृश्चिक राशीत आल्यावर बिघडवेल. जोडीदाराच्या नातेवाईकांवर पूर्ण विसंबून राहता येणार नाही. आपण तत्त्वनिष्ठ असल्यामुळे तुमचे विचार सर्वांनाच पटतील असे नाही.

मेपर्यंत गुरू हा भाग्यात असल्यामुळे व पंचमेश भाग्यात असल्यामुळे परदेशगमन, तीर्थाटन, पर्यटन घडेल. भावंडांचे संबंध चांगले राहतील. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी परदेशगमनाची संधी लाभेल. विवाहेत्सुकाचे विवाह ठरतील. संतती होईल. गुरूबरोबरील हर्षलमुळे प्रवासात त्रास संभवतो. (Leo Horoscope 2024)

मेनंतर गुरू राशीच्या दशमस्थानी येईल. हा गुरू पंचमेश असल्याने संततीला उच्च पद किंवा उच्च यश मिळवून देईल. कर्तृत्ववान व्यक्तीच्या हातून मोठे कार्य होऊ शकेल, ज्यामुळे त्यांचा नावलौकिक वाढेल, तरीही या व्यक्तींनी या काळात अंतर्मुख होऊन काम केले, तर गुणवत्ता आणखी वाढवणे यांना शक्य होईल. त्याचा उपयोग पुढे गुरू राशीला लाभस्थानी येईल (मिथुनेत) तेव्हा होईल. गुरूबरोबर असलेला दशमस्थानातील हर्षल धंदा, व्यवसायात अचानक बदल घडवून आणेल; पण ते फायदेशीर होतील.

मंगळाचे प्लुटो शनीबरोबरच्या अशुभ योगात (जून, जुलै, ऑक्टो., नोव्हें., डिसेंबर) कष्ट वाढतील. अडचणी, अपघात, अनारोग्य अनुभवाल. शुक्राचे फेब्रुवारी, मार्च, मे, जून महिन्यातील भ्रमणात धंदा, व्यवसायात स्पर्धा वाढेल. भावनिक दडपण येईल. बुधाच्या मे, जुलै-ऑगस्टमधील भ्रमणात बोलताना जिभेवर नियंत्रण ठेवले नाही, तर माणसे दुखावली जातील.

बुध मेषेत मेमध्ये असताना सद्स‌द्विवेकबुद्धी जागृत ठेवा. सूर्याच्या मकर (जाने-फेब्रु.), वृषभ- मिथुन (मे, जून, जुलै), तूळ (ऑक्टो.-नोव्हें.) राशीतील भ्रमणात सर्व कार्यात यश, प्रगती, मानसन्मानसह आर्थिक लाभ होतील.

सूर्याच्या मीन (मार्च-एप्रिल), कर्क (जुलै-ऑगस्ट) व वृश्चिक (नोव्हें., डिसें.) राशीतील भ्रमणात शारीरिक दगदग, धंद्यात मंदी, स्पर्धा जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. घरगृहस्थीची काळजी राहील. या वर्षीच्या पूर्वार्धात विपरीत घटनेतून लाभ होण्याचे अनुभव येत राहतील.
रवीच्या कन्या राशीतील भ्रमणात नेत्रविकार जाणवतील. प्रॉपर्टीच्या कामासाठी पूर्ण वर्ष चांगले राहील.

सर्वसाधारण नियमाप्रमाणे

कार्यसिद्धीसाठी चंद्रबल आवश्यक असते. या वर्षात आपल्या राशीसाठी एकंदरीत वर्ष प्रगतिकारकच राहील; पण पूर्वार्धात जास्त विकास, उत्कर्ष, भरभराट होईल.

Leo Horoscope 2024 : चंद्रबल (तारखा)

 • जानेवारी : १२, १५, २१, २२, २३, २४, २८, २९.
 • फेब्रुवारी : १७, १७, २०, २१, २४, २५, २९.
 • मार्च : १, १५, १७, १९, २२, २३, २४, २७, २९.
 • एप्रिल : १३, १४, १५, १९, २०, २४, २५. मे : १६, १७, २१, २५, २८.
 • जून : १२, १३, १७, १८, १९, २४, २५.
 • जुलै : ११, १५, १६, २२, २३, २४, २५.
 • ऑगस्ट : ११, १२, १८, १९, २०, २१.
 • सप्टेंबर : ९, १४, १५, १७, १८, २३.
 • ऑक्टोबर : १२, १३, १४, १५, २०, २१.
 • नोव्हेंबर : ८, ९, १०, ११, १६, १७, १९, २०.
 • डिसेंबर : ७, ८, १४, १५, १८, १९.

हेही वाचा 

Back to top button