Pimpri : मराठा समाजाचे साखळी उपोषण स्थगित | पुढारी

Pimpri : मराठा समाजाचे साखळी उपोषण स्थगित

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पिंपरी येथे गेल्या 25 दिवसांपासून सुरु असलेले साखळी उपोषण मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या (पिंपरी-चिंचवड) वतीने रविवारी (दि. 31) स्थगित करण्यात आले. राज्य सरकारने 20 जानेवारीपर्यंत मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले नाही तर मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे. मुंबई येथील आंदोलनास पिंपरी-चिंचवड शहरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तसा संकल्प सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या (पिंपरी-चिंचवड) वतीने करण्यात आला आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी शहरात विविध ठिकाणी बैठका घेण्याचे निश्चित केले आहे.

संबंधित आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण स्थगित केले असल्याचे मराठा क्रांती मोर्चाने कळविले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चार महिन्यांपासून राज्यभरात विविध प्रकारचे आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाकडून विविध ठिकाणी साखळी उपोषण सुरु होते. त्याचाच एक भाग म्हणून शहरात मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या (पिंपरी-चिंचवड) वतीने गेल्या 25 दिवसांपासून पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात साखळी उपोषण सुरु होते. हे उपोषण रविवारी सायंकाळी पाच वाजता स्थगित करण्यात आले.

सतीश काळे, वैभव जाधव, मीरा कदम, संतोष शिंदे, रावसाहेब गंगाधरे, लहू लांडगे, दिलीप गावडे, वसंतराव पाटील यांनी साखळी उपोषण मागे घेतले. या प्रसंगी प्रकाश जाधव, मारुती भापकर, अशोक सातपुते, मोहन जगताप, कल्पना गिड्डे, सुनिता शिंदे आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button