बिबट नियंत्रणात आणणे वनविभागाच्या आवाक्याबाहेर | पुढारी

बिबट नियंत्रणात आणणे वनविभागाच्या आवाक्याबाहेर

 नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : वनविभाग आणि शासन बिबट्याच्या नसबंदीबाबत काही निर्णय घेईना. त्यामुळे जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या काही केल्या कमी होत नसल्याची स्थिती आहे. परिणामी, बिबट नियंत्रणात आणणे आता वनविभागाच्या आवाक्याबाहेर चालले असून, बिबट्यांच्या नसबंदीचा निर्णय न घेतल्यास खाद्य म्हणून पिंजर्‍यात आता वनविभागाच्या अधिकार्‍यांनाच ठेवण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवराम लांडे यांनी दिला आहे. पिंजर्‍यात येईलच कसा? हे वनविभागाला माहीत असून देखील स्थानिक शेतकर्‍यांच्या रोषाला बळी पडायला नको म्हणून वनविभागाचे कर्मचारी पिंजरा लावतात.

सध्या जुन्नर तालुक्यामध्ये 400 ते 500 बिबटे असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून या बिबट्यांना रोखणे वनविभागाच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे. जुन्नर तालुक्यामध्ये ओतूर आणि नारायणगाव अशी दोन वनक्षेत्रपाल कार्यालये आहेत. या दोन कार्यालयाच्या अंतर्गत दररोज कुठे ना कुठे बिबट्यांचा हल्ला झाल्याची बातमी येत असतेच. सध्या बिबट्याने जुन्नर तालुक्याचे आदिवासी भागामध्ये मोर्चा वळविल्याचे पाहायला मिळत आहे. आदिवासी भागामध्ये तसे बिबट्याला लपायला फारशी जागा नाही, परंतु खाद्य सहज उपलब्ध होत आहे. शेतकर्‍यांची पाळीव जनावरे, शेळ्या साध्या गोठ्यामध्ये असतात आणि मग बिबट्याला भक्ष्य सहज उपलब्ध होते.

दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी वनविभागाला इशाराच दिला आहे. बिबट्याला पकडून ताडोबा जंगलात सोडा तसेच बिबट्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घ्या, अन्यथा नवीन वर्षाच्या सुरुवातीला बिबट्याला पकडण्यासाठी ठेवण्यात येणार्‍या पिंजर्‍यात बिबट्याला खाद्य म्हणून वनविभागाचे अधिकारीच ठेवू, असा इशारा दिला आहे.

Back to top button