पुणे-मुंबई महामार्गावर कोंडी ; पुण्याकडे येणार्‍या मार्गिका फुल्ल | पुढारी

पुणे-मुंबई महामार्गावर कोंडी ; पुण्याकडे येणार्‍या मार्गिका फुल्ल

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शाळांना, काही खासगी कार्यालयांना नाताळ सणानिमित्त सुट्या पडल्याने आणि विकेंडच्या मिळालेल्या सलग सुट्यांमुळे पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर शनिवारी (दि.23) वाहतूक कोंडी झाली होती. वाहनचालकांना कोंडीत तासन्तास अडकून राहावे लागले, कोंडीतून वाट काढताना वाहनचालकांच्या नाकीनऊ आल्याचे चित्र दिसले. सलग सुट्या मिळाल्या की, यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर (पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे) वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. कमी वेळात वेगवान प्रवास व्हावा, याकरिता या मार्गाची 2002 साली निर्मिती करण्यात आली. तब्बल 94.5 किलोमीटरच हा मार्ग दोन्ही शहरांतील वाहन प्रवास वेगवान करणार होता. मात्र, सद्यस्थितीमध्ये या मार्गावर दर विकेंडला प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पुणेकर आणि मुंबईकरांना याचा मनस्ताप होत आहे. महामार्ग पोलिस आणि या महामार्गावर काम करणार्‍या अन्य यंत्रणांकडून अद्यापर्यंत ठोस उपाययोजना करण्यात यश आलेले नाही.

महामार्ग पोलिसांचे नियोजन
सलग सुटी आल्यामुळे घाटामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी घाट सुरू होण्यापूर्वी जड अवजड वाहनांना थांबविण्यात आले. जड अवजड वाहनांना सकाळी 6 ते दुपारी 12 या वेळेत एक्स्प्रेस वेवर बंदी केली होती. कोंडी सोडविण्यासाठी ब्लॉक घेण्यात
आले. असे नियोजन केल्याचे राज्याचे अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी पत्राद्वारे सांगितले.

अशी झाली कोंडी
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेच्या (मुंबई दिशेकडून) सुरुवातीलाच वाहतूक कोंडीला शनिवारी कोंडी झाली होती. संपूर्ण बोरघाट वाहनांच्या कोंडीने जाम झाला होता. मुंबईतून बाहेर पडणार्‍या वाहनांची संख्या सर्वाधिक असल्याने पुण्याच्या दिशेला असलेल्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहनचालकांना दोन ते तीन तास या कोंडीतून वाट काढावी लागली. लोणावळा, खंडाळा बोगदा, शिंग्रोबा मंदिर परिसर, खंडाळा व्यु पॉईंट, खालापूर, उर्से टोलनाका, तळेगाव टोलनाका परिसरात कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.

Back to top button