Accident : चिव्हेवाडी घाटात ट्रकची कारला धडक : दोन ठार | पुढारी

Accident : चिव्हेवाडी घाटात ट्रकची कारला धडक : दोन ठार

सासवड : पुढारी वृत्तसेवा : देवडी (ता. पुरंदर) येथील चिव्हेवाडी घाटाच्या पहिल्या वळणावर भरधाव वेगाने ट्रकने समोरून येणार्‍या कारला जोरदार धडक दिली. यामध्ये कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि. 16) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. गणेश उर्फ बाळा शिवाजी लेकावळे (रा. किकवी, ता. भोर) व तृप्ती अक्षय जगताप (रा. सुपे खुर्द, ता. पुरंदर) अशी मृतांची नावे आहेत.

तर प्रकाश बाबूराव दरेकर (रा. धावडी, ता. भोर) व कृष्णा अक्षय जगताप (रा. सुपे खुर्द, ता. पुरंदर) यांच्यासह ट्रकचा चालक व क्लिनर असे चौघे जखमी झाले आहेत. याबाबत रोहिदास पांडुरंग लेकावळे (रा. किकवी, ता. भोर) यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी टायर ट्रक (एमएच 15 डीके 4247) वरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिव्हेवाडी घाटाच्या पहिल्या वळणावर बारा टायरचा ट्रक (एमएच 15 डीके 4247) हा भरधाव वेगात जात होता.

त्यावेळी समोरून आलेल्या कारला (एमएच 14 डीटी 9587) या ट्रकने जोरात धडक दिली. त्यात कारमधील गणेश आणि तृप्ती यांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला, तर प्रकाश आणि कृष्णा यांच्यासह ट्रकचा चालक आणि क्लिनर असे चौघे जखमी झाले. या चौघांना उपचारासाठी सासवड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे, सहायक फौजदार दत्तात्रय माने, पोलिस कर्मचारी सुहास लाटणे हे करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button