मंजूर शिफारशीची अंमलबजावणी त्वरित करू : गुलाबराव पाटील | पुढारी

मंजूर शिफारशीची अंमलबजावणी त्वरित करू : गुलाबराव पाटील

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मातंग समाजासाठी स्थापन केलेल्या क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आयोगाने केलेल्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार सुनील कांबळे यांनी विधिमंडळात उपस्थित केलेल्या लक्षवेधीचे उत्तर देताना दिली. आ. कांबळे यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मातंग समाजाच्या प्रश्नांसदर्भात लक्षवेधी मांडली. मातंग समाज हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वास्तव्यास आहे.

या समाजातील बहुतांशी नागरिक भूमिहीन असून, मोलमजुरी करून आपले जीवन जगतात. शासकीय सेवेतदेखील या समाजातील युवकांची संख्या अत्यंत अल्प आहे. शासनाने समाजाच्या मागण्या तसेच क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे आयोगाच्या 82 पैकी 68 शिफारशी तत्वतः मान्य केल्या. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही, असे सांगितले.

यावर उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी लहुजी वस्ताद साळवे समितीच्या ज्या शिफारशी सरकारने मान्य केलेल्या आहेत, त्या शिफारशीनुसार समाजातील घटकांना तत्काळ लाभ दिला जाईल. तसेच हा लाभ समाजातील घटकांपर्यंत पोहोचला की नाही यासाठी लवकरच मंत्रालयीन पातळीवर एक आढावा बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही दिली. लहुजी वस्ताद साळवे यांची क्रांती व्यायामशाळेचे राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे प्रस्ताव सादर केला, तर त्याची अंमलबजावणी करता येईल, असेही सांगितले.

हेही वाचा

Back to top button