रहस्‍यरंजन : शांग्रीलाचा गूढ प्रदेश | पुढारी

रहस्‍यरंजन : शांग्रीलाचा गूढ प्रदेश

ऋतुपर्ण

जगातल्या अनेक दिग्गज लेखकांनी शांग्रीलाविषयी लिहिलेलं आहे. जेम्स हिल्टन यांच्या ‘द लॉस्ट होरायझन’ नामक कादंबरीत शांग्रीलाच्या रहस्यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच अरुण शर्मा यांनी ‘तिब्बत की वह रहस्यमय घाटी’ या पुस्तकातही शांग्रीलाच्या रहस्याविषयी लिहिलेलं आहे.

आपण ज्या जगात राहतो, ते विविध रहस्यमय आणि वैचित्र्यपूर्ण गोष्टींनी भरलेलं आहे. आता हेच पाहा ना, कधीही न बुडणारे भव्य जहाज, अशी ज्याची मोठी जाहिरात केली होती, ते ‘टायटॅनिक’ हे 1912 मध्ये तयार झालेलं जहाज त्याच्या पहिल्याच प्रवासात दोन तुकडे होऊन समुद्राच्या तळाशी गेलं. जगात अशी अनेक जहाजं बुडतात, फुटतात. विमानांना अपघात होतो, ती कोसळतात इत्यादी. असं असलं, तरी ही जहाजं आणि विमानं यांचे अवशेष हे कुठं ना कुठं तरी सापडतातच. त्यांच्या अपघाताची ठोस कारणंसुद्धा सापडतात; पण जगात एक ठिकाण असं आहे की, समुद्रावरून जाणार जहाजं असो की, आकाशातून उडणारं विमान असो, त्या विशिष्ट क्षेत्रात गेलं रे गेलं की, ते तत्काळ नाहीसं होतं. त्यांचं काय झालं, ती कुठं आणि कशी अद़ृश्य झाली, हे काही समजत नाही की, त्यांचा एखादाही अवशेष कुठंही सापडत नाही. त्या क्षेत्राला, बर्म्युडा त्रिभुज – बर्म्युडा ट्रँगल, असं म्हणतात. गेल्या अनेक वर्षांत जगभरच्या शास्त्रज्ञांनी सातत्यानं शोध घेऊनसुद्धा बर्म्युडा त्रिभुजाच्या रहस्याचा शोध ते घेऊ शकलेले नाहीत.

बर्म्युडा त्रिभुजप्रमाणेच पर्वतशिखरावरील असंच एक रहस्यमय ठिकाण आहे – शांग्रीला घाटी! ही घाटी तिबेट आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमांदरम्यान आहे. असं मानलं जातं की, हा दुसर्‍या जगात जाण्याचा मार्ग आहे. कारण, शांग्रीलावर जो कोणी मनुष्य गेला, तो कधीही परत आलेला नाही. शांग्रीलावर अनेक रहस्यं दडलेली आहेत, असं म्हणतात. त्यातल्या काही रहस्यांचा उलगडा झालेला आहे आणि इतर बर्‍याच रहस्यांचा उलगडा झालेला नाही. या घाटीला शंभाला आणि सिद्धाश्रम असंही म्हणतात. या प्रदेशात ज्ञानगंज मठ, सिद्ध विज्ञान आश्रम आणि योग सिद्धाश्रम अशी तीन साधना केंद्रं आहेत, असं म्हणतात. जगातल्या अनेक दिग्गज लेखकांनी शांग्रीलाविषयी लिहिलेलं आहे. जेम्स हिल्टन यांच्या ‘द लॉस्ट होरायझन’ नामक कादंबरीत शांग्रीलाच्या रहस्यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच अरुण शर्मा यांनी ‘तिब्बत की वह रहस्यमय घाटी’ या पुस्तकातही शांग्रीलाच्या रहस्याविषयी लिहिलेलं आहे. वायुमंडलाच्या चौथ्या आयामाने ही घाटी प्रभावित आहे, असं वर्मा लिहितात. शांग्रीला हा प्रदेश काळाच्या प्रभावाखाली येत नाही, तो कालातीत आहे किंवा काळ इथे थांबलेलाच असतो, असं त्यांचं म्हणणं आहे. तिथं मन, प्राण आणि विचारांचं सामर्थ्य अत्युच्च पातळीला जाऊन पोहोचतं, असंही म्हटलं जातं. याउलट कोणतीही वस्तू किंवा कोणताही जीवित प्राणी शांग्रीलावर पोहोचला, तर त्याचं अस्तित्व शिल्लकच राहत नाही, असंही म्हटलं जातं. चीनच्या सेनेनं हे रहस्य शोधण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला; पण त्या सेनेला त्यात यश मिळालं नाही. त्यांना तिथं काहीही आढळून आलं नाही. कारण, ही सेना तिथपर्यंत पोहोचूच शकली नाही.

आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांनाही शांग्रीलाचे आकर्षण वाटत असते. रामायण, महाभारतात आणि वेद-उपनिषदांत उल्लेख असलेल्या या प्रदेशाला पृथ्वीवरचं महत्त्वाचं आध्यात्मिक आणि मंत्र-तंत्राचं केंद्र मानलं जातं. या घाटीविषयी ‘काल विज्ञान’ नामक ग्रंथात साद्यंत माहिती आहे, असं सांगितलं जातं. हा ग्रंथ तिबेटच्या तवांग मठाच्या ग्रंथालयात ठेवलेला आहे. हे एक काल्पनिक ठिकाण आहे, असं जेम्स हिल्टन यांचं म्हणणं आहे. अनेकविध पुस्तकांत वाचून जगभरातील अनेक उत्सुक पर्यटक आणि संशोधकांनी शांग्रीलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना अपयश आलं. कुणीही, काही ठोसपणे शांग्रलाविषयी सांगू शकलेलं नाही; पण इतक्या सगळ्या पुस्तकांमध्ये शांग्रीला घाटीविषयी लिहिलं गेलेलं आहे, ते कसं काय? हा प्रश्न उरतोच.

हा प्रदेश अंतराळवासीयांशी संबंधित आहे, असं तिबेटी विद्वान युत्सुंग यांचं मत आहे. आपण स्वतः तिथं जाऊन आलो आहोत, असं युत्सुंग यांनी नोंदवलेलं आहे. युत्सुंग हे एक बौद्ध साधक आहेत. शांग्रीलावर सूर्यप्रकाश नाही आणि तिथून चंद्र-तारे दिसत नाहीत, तिथं दुधाळी रंगाचा प्रकाश पसरलेला असतो, असं युत्सुंग म्हणतात. या ठिकाणाला पंगासाऊ, असंही म्हणतात. इथून जवळच म्यानमारची सीमा लागते. या प्रदेशात दीड कि.मी. लांबीचं एक अतिशय शुद्ध पाण्याचं सरोवर आहे. त्याची रुंदी एक किलोमीटर आहे. प्राचीन काळी हे सरोवर आता आहे त्यापेक्षा मोठं होतं. हे सरोवर भूचुंबकीय लहरींनी वेढलेलं आहे. त्यामुळं त्याची छायाचित्रं काढता येत नाहीत, असं म्हणतात. दुसर्‍या महायुद्धात एक अमेरिकन विमान आपत्कालीन परिस्थितीत शांग्रीलाच्या सपाट जागेवर उतरवण्यात आलं; पण विमानातले सगळे हवाई सैनिक मृत्युमुखी पडले, अशी एक दुर्घटना सांगितली जाते. शांग्रीलाच्या परिसरात तंगसा ही आदिवासी जमात वास्तव्य करते. त्यांना मध्यरात्रीच्या वेळी इथून अनेक रहस्यमय आवाज ऐकायला येतात, असं ते सांगतात. हे आदिवासी हेच इथल्या अनेक रहस्यमय घटनांचे साक्षीदारही आहेत.

Back to top button