Narayangav : मुक्ताई मंदिरात आता पगारी पुजारी | पुढारी

Narayangav : मुक्ताई मंदिरात आता पगारी पुजारी

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : तीर्थक्षेत्राचा ’ब’ दर्जा असलेल्या नारायणगाव (ता. जुन्नर) येथील ग्रामदैवत श्री मुक्ताबाई मंदिरात पगारी पुजारी नेमणूक, श्री मुक्ताबाई व काळोबा देवस्थान ट्रस्टच्या नवीन पदाधिकार्‍यांची निवड, विकासकामांना गती देण्यासाठी व स्थानिक अडचणी सोडवण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकत्याच झालेल्या गाव बैठकीत घेण्यात आला.
नारायणगाव ग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच झाली, या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी श्री मुक्ताबाई मंदिरात ग्रामसभेचे आयोजन केले होते. या वेळी विविध विषयांवर चर्चा केली. या वेळी विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, उपसरपंच योगेश पाटे, देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष एकनाथ शेटे, माजी सरपंच अशोक पाटे, संतोष वाजगे, आशिष माळवदकर, अविनाश कांबळे, राजेंद्र कोल्हे, अशोक पाटे, संजय खरे, डॉ. के. भुजबळ, शरद दरेकर, राजेंद्र पाटे, अक्षय खैरे, संग्राम घोडेकर, एजाज आतार, सुजित पाटे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रलंबित रस्त्याचे काम करण्याची व पुणे-नाशिक महामार्गालगत फेरीवाल्यांनी केलेली अतिक्रमणे काढण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. या बैठकीत ग्रामपंचायत व देवस्थानच्या माध्यमातून नारायणगाव परिसरात होणार्‍या विविध विकासकामांबाबत समित्या स्थापन करण्यात आल्या. पुणे-नाशिक महामार्गाकडून श्री मुक्ताबाई देवस्थानकडे येणारा पारंपरिक रस्ता स्थानिक जमीन मालकांनी अडथळा निर्माण करून अडवला असून, हा रस्ता खुला करण्याची मागणी करण्याचा व या समितीवर सेवाभावी वृत्तीने काम करणार्‍या ग्रामस्थांची नेमणूक करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. त्यानुसार नदीघाट सुधार प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन शिक्षण, आरोग्य, अतिक्रमण, वृक्षारोपण, सांस्कृतिक, अध्यात्मिक कार्यक्रम आदी समित्या स्थापन करण्याचे सर्वानुमते निश्चित केले.

श्री मुक्ताबाई देवीचे पुजारी म्हणून यापुढील काळात पगारी व्यक्तीची नेमणूक करण्यात येणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या वेळी झालेल्या चर्चेत उपसरपंच पाटे, रामदास तोडकरी, एकनाथ शेटे, अशोक पाटे, डी. के. भुजबळ, रत्नाकर सुबंध, संतोष वाजगे आदींनी भाग घेतला. अजित वाजगे यांनी सूत्रसंचालन केले.

Back to top button