Pune News : नियमबाह्य शुल्क आकारल्यास फौजदारी | पुढारी

Pune News : नियमबाह्य शुल्क आकारल्यास फौजदारी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी शिक्षण शुल्काच्या अधिकाधिक तीनपट, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी चारपट शुल्क द्यावे लागेल. त्याचप्रमाणे एनआरआय कोट्यातून प्रवेशासाठी अधिकाधिक पाचपट शुल्क आकारता येणार आहे. यापेक्षा अधिक शुल्क घेणार्‍या शिक्षण संस्थांच्या विरोधात डोनेशन घेतल्याचा ठपका ठेवून, फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे शुल्क नियामक प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. महाविद्यालयांकडून मनमानी पद्धतीने शुल्काची मागणी होत असल्याने, हे परिपत्रक पुन्हा प्रसिद्ध करण्यात आले आहे.

राज्यातील महाविद्यालयांकडून एमबीबीएस, बीडीएस, एमडी, एमएस, बीएएमएस, बीएचएमएस अशा वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी वैद्यकीय महाविद्यालयांकडून अवाजवी पद्धतीने शुल्क आकारण्यात येत आहे. याबाबतच्या तक्रारी एफआरएला प्राप्त झाल्या. या पार्श्वभूमीवर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) एफआरएकडे विचारणा करून, शुल्काबाबत माहिती प्रसिद्धी करण्याची विनंती केली.

त्यानंतर एफआरएने प्रसिद्धिपत्रकाद्वारे मॅनेजमेंट कोटा आणि एनआरए कोट्याच्या शुल्काची माहिती दिली आहे.
त्यानुसार एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीयूएमएस, ऑक्युपेशनल थेरपी अशा पदवी अभ्यासक्रमांना मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेताना, विद्यार्थ्याला अधिकाधिक तीनपट शुल्क भरावे लागणार आहे. एमडी, एमएस, एमडीएस यांच्यासह इतर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मॅनेटमेंट कोट्यातून प्रवेश घेताना, विद्यार्थ्याला अधिकाधिक चारपट शुल्क भरावे लागणार आहे.

त्याचप्रमाणे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना एनआरआय कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी अधिकाधिक पाचपट शुल्क भरावे लागणार आहे. यापेक्षा अधिक शुल्क कॉलेजांना आकारता येणार नाही. विद्यार्थ्यांकडून जादा शुल्क किंवा अतिरिक्त शुल्काची मागणी करीत असल्यास, त्या कॉलेजच्या विरोधा www. mahafra.orgया वेबसाइटच्या ग्रिव्हन्स पोर्टलवर किंवा fra.govmhgmail.com  या ई-मेलवर  तक्रार दाखल करता येईल, असे एफआरएने स्पष्ट केले आहे.

वारंवार शुल्काची मागणी करू नका

विद्यार्थ्याला एका शैक्षणिक वर्षात एकदाच शुल्क भरावे लागणार आहे. महाविद्यालयांकडून एकापेक्षा अधिक वेळा शुल्काची मागणी होत असल्यास, त्या कॉलेजवर डोनेशन घेतल्याचा ठपका ठेवून, फौजदारी कारवाई केली जाईल, असे एफआरएने नमूद केले आहे.

हेही वाचा

Back to top button