वंचित-एमआयएम 2019 चा चमत्कार पुन्हा घडविणार! | पुढारी

वंचित-एमआयएम 2019 चा चमत्कार पुन्हा घडविणार!

प्रमोद चुंचूवार

2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून देणारी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या पक्षांनी पुन्हा एकदा या लोकसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून देण्यासाठी कंबर कसली आहे. वंचितने 30 हून अधिक ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले असून, एमआयएमनेही काही ठिकाणी उमेदवार दिले आहेत.

सध्या 18 व्या लोकसभेसाठी निवडणूक चालू असून, या निवडणुकीची धामधूम सुरू होण्यापूर्वीच वंचितने महाविकास आघाडीसोबत जागा वाटपाबाबत वाटाघाटी सुरू केल्या होत्या. चर्चेच्या अनेक फेर्‍या झाल्यानंतरही जागा वाटपाबाबत तडजोड न झाल्याने वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र लढायचा व त्यासोबतच काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वंचितने जवळपास 35 मतदार संघांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. सोमवारीच वंचितने मुंबई उत्तर मतदार संघासाठी उमेदवार सोनल दिवाकर गोंडाणे यांना उमेदवारी जाहीर केली. त्या बौद्ध धर्मीय असल्याचे वंचितने आपल्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे. वंचितने उमेदवारी देताना समाजातील विविध घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक अभियांत्रिकीचा हा प्रयोग करताना त्यांनी मतदार संघातील उमेदवारी जाहीर करताना संबंधित उमेदवार कोणत्या जातसमूहाचा आहे, हे सुद्धा स्पष्ट केले आहे. अशा प्रकारे आपल्या प्रसिद्धी पत्रकातच ही माहिती देणारा वंचित हा एकमेव पक्ष आहे.

सामाजिक अभियांत्रिकी करताना ज्या जात समूहाला पारंपरिक राजकारणात संधी मिळत नाही, त्या जात समूहाला संधी देण्याचे काम आपल्या अकोला पॅटर्नच्या माध्यमातून आजवर प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे उदाहरण घेतले, तर या मतदार संघात सर्व प्रमुख पक्ष लोकसंख्येने सर्वाधिक असलेल्या मराठा समाजाला प्रतिनिधित्व देतात. मात्र, त्यांनी या मतदार संघातील प्रमुख समाज असलेल्या माळी समाजातील वसंतराव मगर यांना संधी दिली. आंबेडकरांनी कुठे मराठा, कुठे कुणबी, कुठे तेली, कुठे धनगर, कुठे मुस्लिम उमेदवारही दिला आहे.

2019 च्या कामगिरीच्या पुनरावृत्तीसाठी नियोजन

2019 सारखे आपले उपद्रवमूल्य दाखवून देण्याची खेळीही त्यांनी यावेळी खेळली आहे. बीडमध्ये कुणबी मराठा समाजातील अशोक हिंगे हे देखील मातब्बर नेत्यांमधील एक आहेत. हिंगे हे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष असून, ते बाळासाहेब आंबेडकर यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. त्यामुळे बीड मतदार संघात ते किती मते घेतात, यावर महाविकास व महायुतीतील कोणता उमेदवार विजयी होईल, हे ठरू शकते.

अकोल्यात तर स्वतः प्रकाश आंबेडकर रिंगणात असून, ते विजयाच्या स्पर्धेत आहेत. पुण्यात मनसेतून आलेले वसंत मोरे यांना मिळणार्‍या मतांचा फटका काँग्रेस की भाजप उमेदवाराला बसेल, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. मावळमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातून आलेल्या माधवी जोशी यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांच्यामुळे काही प्रमाणात महाविकास आघाडीचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नांदेडमध्ये त्यांनी 2019 मध्ये धनगर समाजातील अभ्यासू नेतृत्व प्रा. यशपाल भिंगे यांना संधी दिली होती. त्यांनी 1.62 लाखांच्या घरात मते घेतल्याने या मतदार संघात तेव्हा काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांचा 40 हजार मतांनी भाजपच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता. यावेळेसही आंबेडकरांनी नांदेड मतदार संघासह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या लिंगायत समाजाला संधी दिली आहे. लिंगायत समाजातील अविनाश भोसीकर यांना नांदेड, धाराशिवमध्ये भाऊसाहेब आंधळकर, तर रमेश बारसकर यांना माढा मतदार संघात उमेदवारी दिली आहे. इतर राजकीय पक्ष मुस्लिम उमेदवार द्यायला कचरत असताना त्यांनी संभाजीनगरात अफसर खान, धुळेत अब्दूर रहमान, मुंबई दक्षिण मध्य मतदार संघात अबूल हसन खान, मुंबई उत्तर पूर्वमध्ये दौलत कादर खान यांना उमेदवारी दिली आहे.

आपण केवळ दलितांचेच राजकारण करीत नसून, राज्यातील प्रमुख समाज असलेल्या मराठा समाजालाही राजकीय प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करीत आहोत, असेही दाखवून देण्याचा प्रयत्न आंबेडकरांनी केला आहे. नाशिकमध्ये मराठा आंदोलनातील करण गायकर, परभणीत पंजाबराव डख, वर्ध्यात राजेंद्र साळुंखे, रायगडमध्ये कुमुदिनी चव्हाण, पुण्यात वसंत मोरे व बीडमध्ये अशोक हिंगे या मराठा समाजातील नेत्यांनाही वंचितने लोकसभेची उमेदवारी दिली आहे.

दलित व बौद्ध मतदार हा वंचितचा पाठीराखा मानला जातो. अनुसूचित जातीतील नेत्यांना साधारणतः या प्रवर्गासाठी राखीव मतदार संघातच उमेदवारी दिली जाते. मात्र, वंचितने राखीव नसलेल्या मतदार संघातही बौद्ध उमेदवार दिले आहेत. उत्तर मुंबईत सोनल गोंडाणे, रामटेकमध्ये किशोेर गजभिये यांना पाठिंबा, रावेरमध्ये संजय ब्राह्मणे, मुंबई उत्तर पश्चिम परमेश्वर रणशूर या बौद्ध धर्मीय उमेदवारांनाही वंचितने संधी दिली आहे.

पाठिंब्याच्या माध्यमातून मविआला मदत

2019 च्या निवडणुकानंतर वंचितने काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फोडली आणि अप्रत्यक्षपणे भाजपला मदत केली, असा प्रचार वंचितविरोधात झाला. याही वेळेस वंचितला मत म्हणजे भाजप-शिवसेना महायुतीला मदत अशा प्रचार होतोय. हे टाळण्यासाठी यावेळेस वंचितने सावध पावले उचलली आहेत. राज्यात काही ठिकाणी उमेदवार उभे न करता त्यांना पाठिंबा देण्याची भूमिकाही यावेळेस त्यांनी घेतली आहे. वंचित ही फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे राजकारण करते. त्यामुळे राजर्षी शाहू यांचे वारसदार कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांना वंचितने पाठिंबा जाहीर करून एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच नागपुरात वंचितने काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना, तर बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

यवतमाळ-वाशिम मतदार संघात एस.जे.पी.चे डॉ. अनिल राठोेड, अमरावतीत प्रकाश आंबेडकरांचे बंधू व रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर, भिवंडीत जिजाऊ संघटनेचे नीलेश सांबरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. स्वतंत्र लढत असलो, तरी आपण महाविकास आघाडी सोबतच आहोत, असे दाखवून देण्याचा प्रयत्न वंचिततर्फे केला जात आहे. आपण भाजपची बी टीम असल्याचा शिक्का पुसून टाकण्याचा प्रयत्न यावेळेस वंचित व एमआयएम यांच्याकडून केला जाताना दिसतोय. दुसर्‍या टप्प्यातील मतदानानंतर येणारी विधानसभा निवडणूक काँग्रेससोबत लढण्याची इच्छाही आंबेडकर यांनी जाहीरपणे व्यक्त केली आहे. निवडणूक ऐन रंगात आलेली असताना वंचितने विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत दोस्ती होऊ शकते, असे संकेत दिल्याने वंचितच्या मतदारांचा कल नेमका कोणत्या दिशेने आहे, हे स्पष्ट झालेय. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची ताकद वाढत असल्याचे मान्य करीत त्यांच्यासोबत जाण्यास आपण तयार असल्याचे आंबेडकरांनी दाखवून दिले आहे.

एमआयएमचेही उमेदवार रिंगणात

एमआयएमने गेल्यावेळेस केवळ एकच उमेदवार उभा केला होता व तो विजयीही झाला होता. याहीवेळेस त्यांनी संभाजीनगरचे विद्यमान खासदार व एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र, गेल्यावेळेस त्यांच्यासोबत वंचित होता. यावेळेस वंचितने मुस्लिम समाजातीलच आपला स्वतंत्र उमेदवार दिला आहे. यासोबतच एमआयएमने पुण्यात अनिस सुंडके यांना उमेदवारी दिली आहे. अहमदनगरमध्ये परवेज अशरफी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी मुस्लिम समाजाच्या दबावामुळे माघार घेतली आहे. कोल्हापुरात एमआयएमनेही शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Back to top button