कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : देशाने अनेक पंतप्रधान पाहिले आहेत. त्यांनी राज्यात जाऊन राज्यांच्या उभारणीबाबत, विकासाबाबत मते मांडली. परंतु सध्याचे पंतप्रधान त्यावर काही बोलत नाहीत. त्यामुळे कितीही वेळा पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आले आणि त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले, तर हा महाराष्ट्र संधी मिळाल्यानंतर त्यांना आपला हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी केला.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ गांधी मैदानामध्ये शिव-शाहू निर्धार सभा आयोजित केली होती. या सभेत ते बोलत होते. सभेला प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी विधानसभेत गद्दारी करणार्यांचा लोकसभा निवडणुकीत सूड घेणारच, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. पवार म्हणाले, देशाचे पंतप्रधान अनेक राज्यांत जात आहेत. तसे कोल्हापुरातही नुकतेच येऊन गेले. परंतु, त्यांचे दौरे पाहता महाराष्ट्राशिवाय त्यांना काही दिसत नाही, असेच म्हणावे लागेल. चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रात आले तर आम्ही तुमचे स्वागतच करतो. महाराष्ट्रात आल्यानंतर काही गोष्टी त्यांनी बोलून दाखविल्या. परंतु, देशाचे पंतप्रधान एखाद्या राज्यात जात असतील, तर राज्यातील धोरणांबाबत, प्रश्नांबाबत चर्चा करणे अपेक्षित असते. तसे मोदी काहीच बोलले नाहीत.
यापूर्वीचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू राज्यांत जात तेव्हा ते राज्यांच्या विकासाबाबत, उभारणीबाबत बोलत असत. पंतप्रधान इंदिरा गांधी अनेकवेळा राज्यांत जायच्या. त्या राज्यातील गरिबी कशी घालवणार यासंबंधी आपले विचार मांडायच्या. परंतु, आजचे पंतप्रधान देशामध्ये फिरतात, महाराष्ट्रामध्ये येतात. पण महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना दोन नावांची प्रकर्षाने अडचण जाणवते. त्यामध्ये एक शरद पवार व दुसरे शिवसेनेचे उद्धव ठाकरे. यामुळे आमच्यावर बोलल्याशिवाय त्यांना राहवत नाही. पंतप्रधान मोदी कितीही वेळा महाराष्ट्रात आले, तरी त्यांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास संधी मिळेल तेव्हा महाराष्ट्र तुम्हाला हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.
विधानसभेत गद्दारी केलेल्यांचा लोकसभेत सूड घेणारच : ठाकरे
गेल्या लोकसभेत नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला; पण भाजपने विधानसभेत शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी शिवसेनेचे अनेक उमेदवार पाडले. आता मी तुम्हाला सोडणार नाही, ज्यांनी माझ्या शिवसैनिकांशी, भगव्याशी गद्दारी केली, त्यांचा मी लोकसभा निवडणुकीत सूड घेतल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
ठाकरे म्हणाले, जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी आलो आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार जिथे जिथे असतील त्यांची निशाणी हात, तुतारी घेतलेला मावळा आणि मशाल आहे. या आपल्या हक्काच्या उमेदवारांना लोकसभेत पाठवा आणि हुकूमशहाचे सरकार गाडून टाका, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र टिकवणार की मोदी-शहा यांच्या हातात देणार, असा सवाल करत ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती. आता दोन सुरतवाले महाराष्ट्र लुटत आहेत. अशावेळी आम्ही डोळ्यांवर झापडे लावून बघत बसणार काय, त्यांना महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपले म्हणजे महाराष्ट्र आपला झाला, असे वाटत होते; पण तसे झाले नाही. उलट नव्या जोमाने आम्ही उभे आहोत. शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना केली जात आहे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यांच्या वाटेला जाऊ नका, महाराष्ट्र सहन करणार नाही. जो महाराष्ट्राच्या मुळावर आलेला आहे, त्याचा सुपडासाफ आम्ही केल्याशिवाय राहणार नाही.
राजकारणात मुले होत नाहीत
कोणाच्याही खासगी आयुष्यात जाऊन डोकावण्याचा प्रयत्न केंद्रातील सरकार करत असल्याचे सांगून ठाकरे म्हणाले, कोणी काय करावे, कोणाला किती मुले आहेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्हाला राजकारणामध्ये मुले होत नाहीत म्हणून आमच्यातले गद्दार चोरून तुम्हाला उभे करावे लागत आहेत. ही आमची काही पोरं तुम्ही चोरली. मुलं पळवणारी तुम्ही टोळी आहात. तुम्ही चाळीस चोरले असाल, शरद पवार यांचे काही चोरले असाल; पण महाराष्ट्रातील कोट्यवधी लोक हे महाविकास आघाडीसोबतही खांद्याला खांदा लावून तुमचा सुपडासाफ करण्यासाठी उभे आहेत.
गायीवर बोलता, महागाईवर का बोलत नाही?
केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत दिलेले कोणतेही आश्वासन पाळले नाही. पंधरा लाख रुपये कोणाच्या खात्यात आले का? नोकरी नाही, घरे नाहीत, गॅसचे दर वाढले, जीएसटीच्या माध्यमातून लोकांचा खिसा रिकामा करण्याचे काम या सरकारने केले. बाकी विषयावर चर्चा करण्यापेक्षा मोदी यांनी 2014 साली काय आश्वासन दिले यावर बोलावे. तशी समोरासमोर चर्चा करण्याची माझी तयारी आहे. पण तुम्ही केवळ गायीवर बोलता, महागाईवर कधी बोलणार, असा सवाल ठाकरे यांनी केला. सगळे वाईड बॉल आणि नो बॉल टाकण्यापेक्षा स्टंपवर बॉल टाका; आमची तयारी आहे. पण पंच मात्र निष्पक्ष असला पाहिजे. तुमच्यासारखा नको. कारण आरोपी तुम्हीच करायचे, शिक्षाही तुम्हीच ठरवणे योग्य नाही, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.
…तर संभाजीराजे यांची जाहीर माफी मागतो
राज्यसभेच्या निवडणुकीत संजय पवार पडले. हा संदर्भ घेऊन दगाफटका कोणी केला माहीत आहे. त्यावेळी संभाजीराजे यांच्या बाबतीत जो निर्णय घेतला तो आम्हा दोघांना माहीत आहे. पण याचा अर्थ आमची मैत्री तुटली, असा होत नाही. त्यांच्याबद्दल मी काही चुकीचा निर्णय घेतला असेल, तर या सभेत जाहीर माफी मागतो, असे सांगून ठाकरे यांनी मी चुकलो असेन; पण तुम्ही चुकू नका, असे सांगून शाहू महाराज यांना विजयी करण्याचे आवाहन केले.